भाजपा आमदार नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्र डागलं आहे. “संजय राऊत हे सरड्यासारखं रंग बदलतात. आग लावण्याचं आणि काडी करण्याचं काम करतात. महाविकास आघाडीची गौतमी पाटील म्हणजे संजय राऊत आहेत,” अशी टीका नितेश राणेंनी संजय राऊतांवर केली आहे. यावर आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नितेश राणे नेमकं काय म्हणाले?
“संजय राऊत हे रंग बदलणारे सरडा आहेत. ते उरलेली शिवसेनेही संपवतील. महाविकास आघाडीची गौतमी पाटील म्हणजे संजय राऊत आहेत. गौतमी पाटील जशी वेगवेगळ्या कार्यक्रमात जाऊन लोकांचं मनोरंजन करते, नाचते, लोकांना नाचवते, ती एक उत्तर कलाकार आहे. शिवाय लोकांमध्ये ती लोकप्रिय आहे,” असं नितेश राणेंनी म्हटलं.
हेही वाचा : नवनीत राणांच्या अमरावती लोकसभेसाठी बच्चू कडू आग्रही; रवी राणा म्हणाले, “आमच्या पाठीमागे…”
“संजय राऊत कोणाचीतरी सुपारी घेऊन…”
“गौतमी पाटील मनोरंजन करत असल्याने लोकांना बघायला आवडते. पण, गौतमीसारखं राऊत रोज सकाळी येऊन लोकांचं मनोरंजन करतात. कोणाचीतरी सुपारी घेऊन आग लावण्याचं काम ते करतात. हा सकाळचा कार्यक्रम बंद झाला पाहिजे,” असं नितेश राणेंनी सांगितलं.
“गौतमी पाटील ही प्रसिद्ध आहे, ती…”
नितेश राणेंच्या विधानावर संजय शिरसाट यांनी भाष्य केलं आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते. “नितेश राणेंनी संजय राऊतांना गौतमी पाटील म्हणू नये. गौतमी पाटील ही प्रसिद्ध आहे. ती लोकांची करमणूक करते. पण, हा माणूस सकाळी उठून लोकांचं डोकं खराब करतो.”
हेही वाचा : गौतमी पाटीलला धमकी देणाऱ्यांसाठी मराठा सेवा संघाचे मोठे विधान; म्हणाले, “मराठा समाजाच्या मुलांनी तिच्या…”
“गौतमी पाटील आणि संजय राऊतांची तुलना…”
“गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात लाठीचार्ज होतो. संजय राऊतांचा टीव्हीवर भोंगा सुरू झाला, की लोक चिडायला लागतात. ही संजय राऊतांची लोकप्रियता आहे. गौतमी पाटील आणि संजय राऊतांची तुलना होऊ शकत नाही. संजय राऊत हे गौतमी पाटील पेक्षा फार छोटे आहेत,” अशी खिल्ली संजय शिरसाटांनी उडवली आहे.