देशात २०२४ होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपावरून तणाव सुरू आहे. अशातच अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळांनी यांनी जागावाटपावर भाष्य केलं आहे. “जेवढ्या जागा शिंदे गटाला मिळतील, तेवढ्याच जागा अजित पवार गटाला मिळाल्या पाहिजेत,” असं विधान छगन भुजबळांनी केलं होतं. यावरून शिंदेंच्या शिवसेनेतील आमदार संजय शिरसाट यांनी भुजबळांना इशारावजा सल्ला दिला आहे.
छगन भुजबळ काय म्हणाले?
“अजित पवार आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत. जागावाटपाबाबत अजित पवारांनी आपलं मत मांडलं आहे. शिंदे गटाचे जेवढे आमदार आलेत, तेवढेच अजित पवार गटाचे आमदार आले आहेत. त्यामुळे शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील, तेवढ्याच जागा अजित पवार गटाला मिळाल्या पाहिजेत,” अशी मागणी छगन भुजबळांनी केली.
“भुजबळांनी आपलं मत त्यांच्या नेत्याकडं व्यक्त करावं”
यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, “छगन भुजबळांना आता वेळ मिळाल्यानं ते महायुतीवर बोलत आहेत. छगन भुजबळ ज्येष्ठ नेते असल्यानं अशी विधानं करायला नकोत. भुजबळांनी आपलं मत त्यांच्या नेत्याकडं व्यक्त करावं. प्रत्येक गोष्ट सार्वजनिक केली, तर त्याचे परिणाम काय होतात, हे भुजबळांना माहिती आहे.”
“…तर युतीत फूट पडायला वेळ लागणार नाही”
“त्यामुळे युती होण्यापूर्वी अशी विधान करणं चुकीचं आहे. आमच्यासारख्यांनी विरोधात वक्तव्य केलं, तर युतीत फूट पडायला वेळ लागणार नाही,” असा इशारा संजय शिरसाटांनी छगन भुजबळांना दिला आहे.