राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना विधान परिषदेतील १२ जागांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन राज्यापालांकडे १२ जणांच्या नावांची यादी पाठवली होती. परंतु या राज्यपालनियुक्त आमदारांच्या यादीला तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजूरी दिली नाही. हे प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयात असून याप्रकरणी सुनावणी सुरू आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यामुळेच राज्यपालांनी ही यादी परत पाठवली असा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ही सगळी शिंदे-फडणवीस आणि दिल्लीतल्या मोदी सरकारची मिलीभगत आहे असंही राऊत म्हणाले.
संजय राऊत यांच्या या आरोपाला आता शिंदे गटाने प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बातचित केली. यावेळी संजय शिरसाट म्हणाले, ती यादी एकनाथ शिंदे यांच्यामुळे गेली की काही तांत्रिक अडचणींमुळे गेली हा विषय वेगळा आहे. हे प्रकरण सध्या उच्च न्यायालयात आहे. याप्रकरणी आता सुनावणी होणार आहे. न्यायालय याप्रकरणी योग्य तो निर्णय घेईल. तुमचा (ठाकरे गट) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर राग होता ना, मग आता ते गेलेत, त्यांच्या जागी नवीन राज्यपाल आले आहेत. ते चांगला निर्णय घेतील.
संजय राऊत यांनी ही सगळी शिंदे-फडणवीस आणि दिल्लीतल्या मोदी सरकारची मिलीभगत आहे असा आरोप केला आहे. त्यावर संजय शिरसाट म्हणाले, हो, आमची मिलीभगत आहे. मग काय झालं? त्यात तुम्हाला काही त्रास आहे का? दिल्लीशी, तिथल्या केंद्र सरकारशी जर महाराष्ट्रातलं सरकार जमवून घेत असेल तर त्याचा त्रास कशाला व्हायला पाहिजे? तुम्हाला एकमेकांची भांडणं पाहिजेत का? केंद्र सरकारबरोबर आपला (राज्याचा) चांगला समन्वय असला पाहिजे.
हे ही वाचा >> कांदा प्रश्नावर मुंडे दिल्लीत, तर फडणवीसांचा जपानहून फोन; महायुतीत श्रेयवादाची लढाई? अजित पवार म्हणाले…
संजय शिरसाट म्हणाले, आमचा केंद्र सरकारशी चांगला समन्यव असल्यामुळेच आज जास्तीत जास्त निधी आपल्यासाठी उपलब्ध होतोय, त्याच कारणामुळे होतोय. म्हणूनच त्यांच्याशी चांगले संबंध असणं कधीही चांगलं. ते कायम असलं पाहिजे, असं आमचं मत आहे.