Ambadas Danve on Sanjay Shirsat : राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. विधानसभेसाठी राज्यात आज (२० नोव्हेंबर) मतदान पार पडत आहे. आता या मतदानानंतर निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे. आज राज्यभरात मतदान पार पडत असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोप-प्रत्यारोपामुळे राजकारण तापलं आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला धमकी दिल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. यासंदर्भातील एक व्हिडीओ दानवे यांनी त्यांच्या एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. यामध्ये संजय शिरसाट हे एका पदाधिकाऱ्याला शिवीगाळ करत असल्याचं व्हिडीओत दिसून येत आहे.
हेही वाचा : “आज तुझा मर्डर फिक्स”, सुहास कांदेंची समीर भुजबळांना धमकी; म्हणाले, “त्यांचे गुंड आले मला…”
संजय शिरसाटांनी व्हिडीओमध्ये काय म्हटलं?
अंबादास दानवे यांनी एक्सवर शेअर केलेल्या व्हिडीओत संजय शिरसाट हे एका पदाधिकाऱ्याला असं म्हणत आहेत की, “नीट करुन टाकेन, एका मिनिटात, मस्ती आली का तुला जास्त”, असं म्हणत असल्याचं दिसत आहे. यानंतर अंबादास दानवे यांनी संजय शिरसाट हे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना धमकी देत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
संजय शिरसाट यांनी काय स्पष्टीकरण दिलं?
“जशास तसं उत्तर द्यावं लागल ना? मी ते उत्तर दिलेलं आहे. मी एक तर कधी कुणाच्या नादी लागत नाही. नादी लागलं तर त्याला सोडतही नाही. या प्रकाराची पोलीस तक्रार करण्याची आवश्यकता नाही. या छोट्या तक्रारी करण्यासाठी वेळ कुणाकडे आहे? छोटा विषय लगेचच त्याच ठिकाणी दाबला पाहिजे. अन्यथा छोटा विषय मोठा होतो आणि त्यानंतर मतदानारांना त्रास होतो. त्यामुळे काही वेळा अशा प्रकारची लोकशाही लोकांना आवडते. विरोधकांना त्यांचा पराभव दिसत असल्यामुळे ते गडबड करण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे”, असं संजय शिरसाट यांनी ट्विव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलताना म्हटलं आहे.
दरम्यान, शिवसेना (शिंदे) पक्षाचे आमदार संजय शिरसाट यांनी काही पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा एक व्हिडीओ विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक्स शेअर केला आहे. तसेच संजय शिरसाट हे दमदाटी करत आहेत. मात्र, पोलीस त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाहीत, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.