संजय राऊत यांनी कुणाकडून किती पैसे घेतले याची यादी आमच्याकडे आहे असा दावा आता शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केला आहे. तसंच त्यांनी उद्धव ठाकरेंनाही उत्तर दिलं आहे. आज नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनातल्या मुलाखतीत एक भाष्य केलं. उद्धव ठाकरेंच्या पक्षात दोन मर्सिडिज दिल्या की एक पद मिळतं असं त्या म्हणाल्या होत्या. त्यावरुन संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हेंना तुम्ही किती मर्सिडिज दिल्या त्याच्या पावत्या वगैरे घेऊन या असं म्हटलं आहे. याबाबत संजय शिरसाट यांना विचारलं असता त्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. तसंच उद्धव ठाकरे जे म्हणाले होते की कोर्टाचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे त्यावरही संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले संजय शिरसाट?
नीलम गोऱ्हे काय बोलल्या हे मला माहीत नाही मात्र मागच्या निवडणुकीच्या वेळेस जे त्यांचे (शिवसेना उद्धव ठाकरे) उमेदवार होते त्यांनी आपण पैसे देऊन उमेदवारी घेतली असे जाहीर केले आहे. इतर पक्षातील अनेकांना त्यांनी पैसे घेऊन तिकीट दिले आहे. आमच्या मतदार संघात कन्नड, पैठण, सिल्लोड, वैजापूर आणि पश्चिम मतदार संघात देखील पैसे देऊन तिकीट दिली गेली आहेत. आधी कार्यकर्त्यांना तिकीट दिलं जात होते मात्र आता पैसे देईल त्याला तिकीट देऊ अशी भूमिका आहे. म्हणून त्यांना जनतेने नाकारले आहे. म्हणून त्यांचं संख्याबळ २० वर येऊन ठेपलं आहे. आम्ही काहीच करत नाही असा आव आणून त्यांनी फुशारकी मारू नये. असं संजय शिरसाट म्हणाले.
संजय शिरसाट यांचं उद्धव ठाकरेंना उत्तर
तसंच न्यायालयाचा जो निकाल लांबला त्याबाबत विचारलं असता शिरसाट म्हणाले, न्यायालयाची प्रक्रिया आहे त्यांनी न्यायालयाकडे पुन्हा रिव्ह्यू पिटिशन दाखल केले पाहिजे, उद्धव ठाकरेंनी न्यायालयाला सांगितले पाहिजे की आम्हाला घाई आहे, लवकर निर्णय द्यावा, न्यायालय न्यायालयाच्या पद्धतीने निर्णय घेतो त्यांच्यावर कुणाचाही दबाव चालत नाही. न्यायालयासमोर जाऊन आपली मागणी मांडणे हा त्यांच्या समोरचा पर्याय आहे.
संजय राऊत यांनी कुणाकडून किती पैसे याची यादी आमच्याकडे आहे-शिरसाट
संजय राऊत यांनी कुणा कुणाकडून पैसे घेतले याची यादी आमच्याकडे सुद्धा आहे. तिकीट जाहीर करताना जो गोंधळ संजय राऊत यांनी घातला आहे गरज पडल्यास त्या लोकांना आम्ही उभे करू असंही शिरसाट यांनी म्हटलं आहे.