पहाटेच्या शपथविधीवरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करुनच अजित पवारांबरोबर सरकार स्थापन केलं होतं, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यानंतर आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. हे सर्व घडवून आणण्यात संजय राऊतच प्यादे होते, असं वक्तव्य संजय शिरसाटांनी केलं आहे. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.
संजय शिरसाट म्हणाले की, “सत्तांतरावेळी मातोश्रीत बैठक झाली. त्यानंतर एकनाथ शिंदेवर जुळवाजुळव करण्याची जबाबरदारी उद्धव ठाकरेंनी दिली होती. तेव्हा संजय राऊत हे वेगळ्या हालचाली करत होते. आम्ही सर्वजण हॉटेलमध्ये होतो. सकाळी उठून पाहतो, तर शपथविधी सुरु होता. त्यावेळी संजय राऊत आणि शरद पवार आपल्या कामात व्यस्त होते. ते कुठेही समोर आले नाहीत.”
“आताजर हे थांबवायचं असेल तर, एकनाथ शिंदेंच्या ऐवजी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची मागणी समोर आली आणि मोठा गेम झाला. उद्धव ठाकरेंना इच्छा नसताना मुख्यमंत्री व्हावं लागलं. हे सर्व घडवण्यात संजय राऊतांना हात होता,” असं संजय शिरसाटांनी सांगितलं.
“एकदा शरद पवार बोलले होते, शिवसेना प्रमुखांच्या हयातील मला जमलं नाही, ते मी आता केलं. याचा अर्थ गांभीर्याने घेतला पाहिजे. हे सर्व घडवून आणण्यात संजय राऊत एक प्यादे होते. संजय राऊतांना शपथविधीचं सर्व माहिती होतं. म्हणूनच संजय राऊत त्यावर काही बोलत नाहीत. अजित पवार बोलले तर बॉम्बस्फोट होईल,” असा दावाही संजय शिरसाटांनी केला.