सोलापूर : माढा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते संजय शिवलाल कोकाटे यांनी पक्षाची साथ सोडून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे याच माढा तालुक्यात शिवसेना शिंदे पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांचे प्रस्थ असून, त्यांच्याशी कोकाटे हे असे जुळवून घेतात, यावर त्यांचे पुढील राजकारण अवलंबून राहणार असल्याचे बोलले जाते.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड बहुमत मिळवून सत्ता मजबूत केली असताना इकडे सोलापूर जिल्ह्यात माढा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने महायुतीला धोबीपछाड दिली होती. परंतु त्यानंतर राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांमुळे सोलापुरातील या पक्षाच्या चारही आमदारांमध्ये चलबिचल सुरू असल्याची चर्चा ऐकायला मिळत असताना कोकाटे यांनी पक्षातून बाहेर पडत शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश करण्याच्या निर्णय घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर माढ्यातील संजय कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून बाहेर पडून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या नंतर आणखी कोणकोणते नेते शरद पवार यांची साथ सोडणार, याचीही सार्वत्रिक उत्सुकता वाढली आहे.
मधल्या काळात स्वतःच्या व्यवसायामुळे अडचणीत येऊन प्रतिमेला धक्का बसलेल्या कोकाटे यांनी २०१९ सालच्या माढा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून राष्ट्रवादीचे तत्कालीन वजनदार आमदार बबन शिंदे यांच्या विरोधात द्वितीय क्रमांकाची ७४ हजार ३२८ मते मिळविली होती. कोकाटे हे मूळचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील गटाचे. विशेषतः दिवंगत माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील यांची ताकद मिळवून त्यांनी राजकारणात मोठे होण्याचा प्रयत्न केला. नंतर ते शिवसेनेत गेले अणि पुन्हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षात आले. त्यानंतर आता पुन्हा त्यांनी शिवसेना शिंदे पक्षात जाण्याची तयारी सुरू केली आहे.