Sanjay Shirsat on Eknath Shinde: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाले. यामध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालं. २३५ जागांनिशी स्पष्ट बहुमत महायुतीनं खिशात घातलं. मविआ अवघ्या ४९ जागांवर मर्यादित राहिली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री महायुतीचाच होणार हे निश्चित होऊन आता आठवडा उलटला. पण अद्याप मुख्यमंत्री नेमकं कोण होणार? याचं गणित सुटलेलं नाही. मुंबई-दिल्ली बैठकांच्या फेऱ्या होत आहेत. पण नाव अद्याप ठरत नसल्याचं चित्र आहे.

या सगळ्या गोंधळात काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या गावी दरेगावात गेल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं. त्यातच त्यांच्या पक्षाचे नवनिर्वाचित आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या विधानामुळे त्यात भर पडली. आपल्या त्याच विधानावर संजय शिरसाट यांनी आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं आहे.

मुख्यमंत्रीपदाबाबत शिंदेंची स्पष्ट भूमिका

संजय शिरसाट यांनी यावेळी मुख्यमंत्रीपदाबाबत एकनाथ शिंदेंची भूमिका स्पष्ट आहे, असा खुलासा केला. “जेव्हा एकनाथ शिंदेंना वाटतं की आपल्याला मोठा निर्णय घ्यायचा आहे, तेव्हा ते दरेगावला जात असतात. ते त्यांच्या आवडीचं ठिकाण असल्यामुळे ते तिथे जातात. पण मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगितलं आहे की मी सरकार स्थापनेत कोणताही अडसर आणणार नाही. भाजपाचे वरीष्ठ जो निर्णय घेतील त्याला माझा पक्ष बांधील राहील. दिल्लीच्या बैठकीतही त्यांनी सांगितलं की आपण निर्णय घ्यावा, आम्हाला तो मान्य असेल”, असं संजय शिरसाट म्हणाले. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या किंवा त्यांच्या नाराजीमागे मुख्यमंत्रीपद असल्याच्या चर्चा त्यांनी फेटाळून लावल्या.

Eknath Shinde in Village : एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार? शिंदेंच्या आमदाराच्या सूचक विधानाने खळबळ; म्हणाले, “ते गावी गेले की…”

“आता खऱ्या अर्थानं भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांनी निर्णय घ्यायचा आहे. एकंदरीत राजकीय समीकरणं पाहून कुणाला मुख्यमंत्री करावं हा विषय मोदी व शाहांकडे आहे. त्या निर्णयाला का वेळ लागतोय याची माहिती आम्हाला नाही. जोपर्यंत मुख्यमंत्री ठरत नाही, तोपर्यंत इतर खात्यांबाबत काही चर्चा झाल्याची माहिती माझ्याकडे नाही”, असं ते म्हणाले.

“राज्य वाऱ्यावर नाही, काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत”

दरम्यान, मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होईपर्यंत राज्य कुणाच्या भरंवश्यावर सोडलंय, असा प्रश्न विरोधकांकडून केला जात असताना त्यावर संजय शिरसाट यांनी उत्तर दिलं आहे. “काहींना प्रश्न पडलाय की महाराष्ट्राचं काय होईल? काही विद्वान तर हेही म्हणायला लागले आहेत की हे सरकार कुणाच्या भरवशावर सोडलंय. ज्यांना राजकारणाशीच काही घेणं नाही, अचानक पावसाळ्यात उगवल्यासारखे ते उगवलेत, त्यांचा अंत कधी होईल माहिती नाही. पण आजही एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत याची त्यांना कल्पना नाही. सरकार आपल्या पद्धतीने काम करतंय. सरकार वाऱ्यावर सोडलेलं नाही”, असं संजय शिरसाट म्हणाले. “सोमवारी भाजपचे पक्षश्रेष्ठी निरीक्षक पाठवणार आहेत आणि त्यात गटनेत्याची निवड होणार आहे हे मला समजलं”, असंही शिरसाट यांनी नमूद केलं.

Story img Loader