दिगंबर शिंदे, लोकसत्ता
सांगली : राहुल गांधी यांची ‘ भारत जोडो’ यात्रा सुरू असताना काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या सांगलीमध्ये काँग्रेसच्या दोन आमदारांसह अर्धा डझन नेत्यांना खासदार संजयकाका पाटील यांनी भाजप प्रवेशाचे खुले आवतन दिल्याने राजकीय क्षेत्रामध्ये खळबळ माजली आहे. भाजपच्या ‘थिंक टॅन्क’मधून या आमंत्रणाला दुजोरा मिळत नसला तरी तसे घडणारच नाही याचीही शाश्वती देता येत नसल्याने साटेलोटय़ाचे राजकारण सामान्य कार्यकर्त्यांच्या दृष्टीने पुन्हा एकदा अनाकलनीयच्या पलीकडचे ठरत आहे. सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय, कुंडलची वन अकादमी ही वास्तू स्व. पतंगराव कदम यांच्या कार्याची साक्ष देत उभी आहेत. सांगली मिरज मार्गावरील भारती हॉस्पिटलही विकासात मोलाची मदत करणारे ठरले आहे. अशा दृष्टय़ा नेत्यांचे नाव एखाद्या चौकाला देण्याचा प्रस्ताव समोर येताच सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी मान्य करीत अमलातही आणला. जिल्हा सामान्य रुग्णालयाजवळ असलेल्या चौकाचे सुशोभीकरण करून या चौकाला स्व. पतंगराव कदम यांचे नामकरण करण्याचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यासह सर्वच पक्षाच्या स्थानिक नेत्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. याचबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. मात्र दोघेही या कार्यक्रमास उपस्थित नव्हते.
राजकीय शेरेबाजीची जुगलबंदी या कार्यक्रमात पाहण्यास मिळाली. मंत्री खाडे यांनी बोलताना सांगितले, मिरज मतदार संघामध्ये आपणाविरुद्ध कोण उमेदवार हवा अशी विचारणा स्व.कदम यांच्याकडून केली जात होती, असे वक्तव्य करताना स्व. मदन पाटील यांच्याशीही आपले घनिष्ठ संबंध होते असेही सांगितले. यावेळी भाषणामध्ये भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी देश कुठे चाललाय याचे भान ठेवा आणि भाजपमध्ये येण्याचा प्रयत्न करा, अन्यथा सर्वाचेच अवघड आहे असा गर्भित इशाराही दिला. व्यासपीठावर त्यांच्याविरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावर निवडणूक लढविलेले काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. विक्रम सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आदी नेते उपस्थित होते. काँग्रेसच्या डझनभर नेत्यांना भाजप खासदारांनी प्रवेशाचा प्रस्ताव दिला. मुळात प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी आपल्या भाषणात केलेल्या टिपणीवर खासदारांची ही प्रतिक्रिया असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यातील सत्ताबदलानंतर माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या भाजप प्रवेशाच्या वावडय़ा उठत आल्या आहेत. या केवळ अफवाच आहेत हे किमान मतदार संघातील जनतेला ज्ञात असावे आणि पक्षीय पातळीवर संशयाचे धुके अधिक दाट होउ नये यासाठी पलूस तालुक्यातील अंकलखोप विकास सोसायटीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आपण कधीही काँग्रेसचा त्याग करणार नसल्याचे सांगितले होते. आताही प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या उपस्थितीमध्ये पक्षनिष्ठा ठसविण्याचा त्यांचा प्रयत्न होता, मात्र पटोलेंचा दौरा अखेरच्या क्षणी रद्द झाल्याने हा डावही अयशस्वी ठरला. मात्र खासदारांनी कोंडी करीत संशयाचे ढग कायम राहतील याची दक्षता घेत गुगली टाकली आहे. राहुल गांधी भाजपचे राजकारण उघडे करण्यासाठी भारत जोडो पदयात्रा सुरू असतानाच सांगलीत मात्र संशयाचे बाटलीबंद भूत पुन:पुन्हा बाहेर काढले जात आहे, यामागे निश्चितच एखादा कार्यकारणभाव असावा अशी शंका सामान्यांना आली तर त्यात वावगे ते काय?
काँग्रेस पक्षावर कायम निष्ठा ठेवून कार्यरत असताना खासदार पाटील यांनी दिलेली काँग्रेस प्रवेशाची खुली ऑफर जाणीवपूर्वक संशयाचे धुके निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. तसा कोणताच विचार आमच्या मनात नसून आम्ही काँग्रेसचा त्याग करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशा पद्धतीने यंत्रणा राबविण्याची भाजपची जुनीच परंपरा असल्याने अशा वक्तव्यांना फारसे महत्त्व देण्यात अर्थ नाही .– विक्रम सावंत, काँग्रेस आमदार