गेल्या काही दिवसांपासून चर्चा असलेला ठाकरे गटातील पक्षप्रवेश अखेर आज पार पडला. पिंपरी-चिंचवडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष, माजी महापौर संजोग वाघेरे यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला. मातोश्रीवर झालेल्या या पक्षप्रवेशासाठी खुद्द उद्धव ठाकरे हेही उपस्थित होते. उद्धव ठाकरेंनीच संजोग वाघेरेंना शिवबंधन बांधून त्यांच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब केलं. संजोग वाघेरेंचा हा पक्षप्रवेश पिंपरी-चिंचवड व मावळमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित पवार गटाच्या चिंता वाढणार?

एकीकडे मूळ पक्षातून बाहेर पडून अजित पवार गटानं वेगळा सवतासुभा निर्माण केल्यामुळे आधीच स्वपक्षीय मतदारवर्गाचा काहीसा रोष अजित पवार गटावर असताना आता गेल्या कित्येक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार गटाला अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. वाघेरे यांचे वडील भिकू वाघेरे पिंपरी-चिंचवडचे महापौर होते. वाघेरे घराणं हे पवार कुटुंबाशी एकनिष्ठ मानलं जातं. स्वत: वाघेरेंनीही महापौरपद व राष्ट्रवादी काँग्रेसचं शहर अध्यक्षपद भूषवलं आहे. पक्षफुटीनंतर ते अजित पवार गटाकडे गेले होते. आता मात्र त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

काय म्हणाले संजोग वाघेरे?

संजोग वाघेरेंनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली. “करोनाच्या काळात उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनामुळेच आपण या विषाणूला रोखू शकलो. तेव्हाच मी उद्धव ठाकरेंच्या कामगिरीने प्रभावित झालो होतो. संजय राऊतही दररोज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला दिशा देण्याचं काम करत असतात”, असं संजोग वाघेरे यावेळी म्हणाले.

पिंपरी : अजितदादांच्या कट्टर समर्थकाचे ठरले, संजोग वाघेरे शनिवारी शिवबंधन बांधणार; राष्ट्रवादीत कोणावर नाराजी नाही, पण…

“या मंडळींनी (सत्ताधारी) आता संविधानाच्या बाबतीत चुकीची भूमिका घेतली आहे. अनेक वेगळे मुद्दे काढले आहेत. या सगळ्याचा विचार आमच्या कार्यकर्त्यांसह आम्ही केला. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय आम्ही घेतला. उद्धव ठाकरे हो म्हणतील का? याविषयी शंका वाटत होती. पण इथे त्यांना भेटलो, तेव्हा अत्यंत मितभाषी असं व्यक्तिमत्व आम्हाला पाहायला मिळालं. आता ते देतील ती जबाबदारी पार पाडण्यासाठी आम्ही सज्ज आहोत”, असं संजोग वाघेरे यावेळी म्हणाले.

संजय राऊतांनी केला बोलेरो-स्कॉर्पिओचा उल्लेख!

दरम्यान, यावेळी बोलताना ठाकरे गटाचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी ५० खोक्यांबरोबरच बोलेरो व स्कॉर्पिओ गाड्यांचाही उल्लेख केला. “५० खोके आणि स्कॉर्पिओ-बोलेरो नाकारून संजोग वाघेरे शिवसेनेत आले आहेत. संतोषजी म्हणाले की मी त्यांना पहिल्यांदा भेटलो तेव्हा ते भावुक झाले. आम्ही सगळेच शिवसेनेच्या बाबतीत भावुकच असतो. तुमच्यावर जबाबदारी आहे की मावळ पुन्हा शिवसेनेकडे खेचून आणायचं. शिवसेनेत कोणत्याही पदापेक्षा शिवसैनिक हे पद मोठं आहे”, असं राऊत म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjog waghere joins uddhav thackeray challenges ajit pawar in pimpri chinchwad mawal pmw