सातारा लोकसभा मतदारसंघात एकूण १८ उमेदवार रिंगणात आहेत. यात जातिपातीच्या गणितांना महत्त्व येणार असे दिसत आहे. नाराज संभाजी संकपाळ अपक्ष पुरुषोत्तम जाधव यांना साथ देणार असल्याचे जाधव यांनी सांगितल्याने चुरस वाढणार हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पुरुषोत्तम जाधव यांनी शिवरायांनी जिथे स्वराज्याची शपथ घेतली त्या रोहिडेश्वरापासून प्रचाराला प्रारंभ करणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
पुरुषोत्तम जाधव यांनी चिन्हवाटपानंतर पत्रकार परिषद घेतली. त्यात सातारा जिल्हय़ातल्या औद्योगिक, पाण्याच्या आणि मूलभूत सोयींच्या कोणत्याही योजना पूर्ण झाल्या नाहीत त्यामुळे नाराज मतदार माझ्या बाजूने आहेत, असे सांगितले. मी निवडून येणार आणि मोदी यांच्या मंत्रिमंडळात माझा समावेश असेल, असे ठामपणे सांगत सध्याच्या खासदारांनी ५ वर्षांत केवळ एकदा तोंड उघडले, मात्र मी मतदार आणि जनतेला प्रश्नच निर्माण होणार नाहीत यासाठी काम करेन, असे प्रतिपादन केले. प्रत्येक पक्षातले नाराज माझ्या बाजूने आहेत. मात्र मी त्यांची नावे जाहीर करणार नाही, पण संभाजी संकपाळ मला मदत करतील असेही त्यांनी सांगितले. वाई येथील विधानसभा मी लढवणार नाही, पण त्यासाठी आ. मकरंद पाटील यांच्यात कोणताही गुप्त समझोता झाली नाही, असे सांगून अनेकांनी मला दूरध्वनीवरून मदत करण्याचे वचन दिले आहे, असेही सांगितले. अशोक गायकवाड माझे मित्र आहेत. महायुतीत मी उमेदवारी मागितली, मात्र तात्त्विक कारणावरून मी नाकारली, आता अपक्ष म्हणून लोकसभा लढणार आहे आणि हा माझा निर्धार आहे. असेही ते म्हणाले. शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतलेल्या रोहिडेश्वर येथे आपण पाडव्यास प्रचाराचा शुभारंभ करत असून, अनेक युवक त्यासाठी रोहिडेश्वरावर येणार असल्याचे जाधव म्हणाले.

Story img Loader