अहिल्यानगर: देहु आळंदीप्रमाणेच, संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिलेल्या ठिकाणाहून, नेवासा येथून परिसरातील सर्व दिंड्यांचा एकत्रित, ज्ञानेश्वर माऊलीचा यंदाच्या आषाढीला पालखी सोहळा निघणार असून यामुळे नेवासा तीर्थक्षेत्रास मोठे वैभव प्राप्त होईल, यासाठी सर्व संत महात्म्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन ज्ञानेश्वर मंदिर देवस्थानचे विश्वस्त हभप देविदास महाराज म्हस्के यांनी केले.

ज्ञानेश्वरी लिखाणस्थान संत ज्ञानेश्वरांची कर्मभूमी आणि वारकरी संप्रदायाची जन्मभूमी असलेल्या नेवासा येथील पैस खांबाला वारकरी संप्रदायामध्ये सर्वात मोठे स्थान आहे. या ठिकाणी महाराष्ट्रासह भारतातील वारकरी वर्षातून एकदाका होईना येऊन पैस चरणी नतमस्तक होतात. एकट्या नेवासा तालुक्यातून ११९ गावातून सुमारे १३० दिंड्या पंढरपूरकडे रवाना होतात. या दिंड्यांच्या परंपरेत दिवसेंदिवस वाढच होत आहे. वारकरी संप्रदायात मानाचे स्थान असलेले विठ्ठल आश्रम (गंगापूर) येथील रामभाऊ महाराज राऊत यांनी आळंदीप्रमाणे नेवासा येथूनही माऊलीची पालखी निघावी व त्यात परिसरातील सर्वच दिंड्यांनी सहभागी व्हावे, असा विचार मांडला. 

आज, शुक्रवारी या उपक्रमाबाबत परिसरातील दिंडीचालक व देवस्थान प्रतिनिधींची नेवासा येथे ज्ञानेश्वर मंदिरात बैठक झाली. बैठकीचे अध्यक्ष रामदेव महाराज राऊत होते तर ज्ञानेश्वर मंदिर विश्वस्त मंडळाचे विश्वस्त देविदास महाराज म्हस्के यांनी मार्गदर्शन केले. ज्ञानेश्वर मंदिराच्या व्यवस्थापनातच या पालखी सोहळ्याच्या आयोजन केले जाणार असल्याने ज्ञानेश्वर मंदिराच्या विश्वस्तात उत्साह आहे. पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी मंदिर विश्वस्तांसह पालखी सोहळ्यात सहभागी दिंड्यांचे चालक १४ एप्रिलला नेवासा ते पंढरपूर जाऊन सर्व मार्गाचे सर्वेक करणार आहे. त्यामध्ये कोठे मुक्काम घ्यायचा, त्यासाठी कोणते नियोजन करावे लागेल याची पूर्वतयारी करणार आहेत.

बैठकीनंतर देविदास महाराज म्हस्के यांनी या पालखी सोहळ्याची जबाबदारी ज्ञानेश्वर मंदिर देवस्थान घेत असून सोहळा भव्यदिव्य होण्यासाठी परिसरातील सर्व भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. बैठकीस ज्ञानेश्वर मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, विश्वास गडाख, ज्ञानेश्वर माऊली शिंदे, नंदकुमार खरात महाराज, गहिनीनाथ आढाव महाराज, लक्ष्मण महाराज नजन, कैलास जाधव, कृष्ण पिसोटे, जनसंपर्क अधिकारी आशिष कावरे व परिसरातील दिंड्याचालक व भावीक उपस्थित होते

अनेक दिंड्या सहभागी होणार

या आषाढी सोहळ्यात नेवासा तालुक्यासह गंगापूर, वैजापूर, श्रीरामपूर, अहिल्यानगर, शेवगाव आदी तालुक्यातील दिंड्या सहभागी होण्याची शक्यता आहे. आजच्या बैठकीत अनेक दिंड्या सहभागी होणार असल्याचे स्पष्ट झाले.