लोणंद : माऊली माऊली आणि विठु नामाचा गजर, टाळ मृदंगाच्या निनादात, हरिनामाच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात भक्तीमय वातावरणात आज सातारा जिल्ह्यात पाडेगाव (ता. खंडाळा) येथे आगमन झाले.
सातारा प्रशासनाच्या वतीने पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. यावेळी खासदार धैरशिल मोहिते – पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, आमदार संजय जगताप, पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पुण्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक समीर शेख, प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, खंडाळा तहसीलदार अजित पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थामन अधिकारी देविदास ताम्हाणे, पालखी सोहळा विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, योगी निरंजन नाथ, यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा…लाडक्या बहिणीसाठी शून्य रुपयात सातारा जिल्हा बँक महिलांचे खाते उघडणार- नितीन पाटील
पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखी सोहळ्याची सूत्रे सातारा प्रशासनाकडे सोपवली. पोलीस विभागाने पालखीला मानवंदना दिली. पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात आपल्या सहा दिवसांसाठी पालखी सोहळा दुपारी दीड वाजता टाळ मृदुंगाच्या गजरात मोठ्या भक्तिमय वातावरणात दाखल झाला. निरा नदीवरील प्रसिद्ध दत्तघाट येथे माऊलींच्या पादूकांना निरा स्नान घातल्यानंतर माऊलींच्या रथाचे स्वागत सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले.स्वागतानंतर पालखी सोहळा लोणंद मुक्कामी मार्गस्थ झाला.
माऊलींच्या गजरात तल्लीन होऊन नवीन वारकरी नाचत होते. भाविकांच्या प्रचंड उत्साहाने माऊलींचा पालखी सोहळा भक्ती सत भक्तीरसात चिंब होऊन गेला. पालखी रथातून उतरवून खांद्यावर घेऊन लोणंदकर ग्रामस्थांनी वाजतगाजत साडेपाच वाजण्याच्या सुमारास पालखीतळावर पोहचवली. पालखी तळावर सर्व पालख्या गोलाकार उभ्या केल्यानंतर चोपदारांनी दंड उंचावल्यानंतर सर्व दिंड्या शिस्तीत ऊभ्या राहील्या यानंतर वारकऱ्यांना सूचना देण्यात आल्यानंतर सायंकाळची समाज आरती होऊन अडीच दिवसांच्या लोणंद मुक्कामी पालखी सोहळा विसावला. यानंतर पादुकांचे दर्शन घेण्यासाठी सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर,कोकण पासून आलेल्या भाविकांनी मोठी गर्दी केली.
हेही वाचा…सोलापुरातील मेफेड्रोन तस्करी; तीन आरोपींना मोक्का अंतर्गत पोलीस कोठडी
पालखी सोहळ्यासाठी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनानुसार निरा विसावा पासून लोणंद अशी चोख बंदोबस्ताची व्यवस्था केली. तसेच संपूर्ण पालखी काळात वेगवेगळ्या पथकांद्वारे लोणंद , फलटण व बरड पर्यंतच्या पालखी बंदोबस्ताचे नियोजन सातारा पोलीसांकडून करण्यात आले आहे.