संत ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळ्याने शनिवारी सातारा जिल्ह्य़ाचा निरोप घेत सोलापूर जिल्ह्य़ात प्रवेश केला. पालकमंत्री दिलीप सोपल यांनी माउलींचे स्वागत करून रथाचे सारध्य केले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने तोफांची सलामी देऊन स्वागत करण्यात आले. सोहळय़ातील महिलांसाठी या मार्गावर स्वच्छता व स्नानगृह बांधणार असल्याची घोषणा यावेळी पालकमंत्र्यांनी केली.
धर्मपुरी (ता.माळशिरस) या सोलापूर जिल्ह्य़ाच्या हद्दीवर पालखी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने या ठिकाणी भव्य शामियाना उभारला होता. माउलींच्या स्वागतासाठी माजी मंत्री बबनराव पाचपुते, हणमंत डोळस पं. स. सभापती राजलक्ष्मी हंसाजीराव माने पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख राजेश प्रधान, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, शंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, तर सोहळ्याला निरोप देण्यासाठी साताऱ्याचे जिल्हाधिकारी एन. रामास्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. एम. प्रसन्न, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित बांगर उपस्थित होते.
शामियान्याजवळ अनेक जिल्हा परिषदांनी ग्रामसभा, ग्रामस्वच्छता अभियान, निर्मलग्राम याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी भारुड आदी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जिल्ह्य़ाच्या सीमेवर पुण्याच्या रंगोली या संस्थेच्या वतीने भव्य रांगोळी काढली होती.
सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. मात्र सोहळा आगमनाच्या वेळी रिपरिप थांबली होती. सोहळ्याने सकाळी ११.३० वाजता जिल्ह्य़ात आगमन केले. या ठिकाणी नीरा उजवा कालव्यास पाणी सोडल्याने भाविकांनी अंघोळी व कपडे धुणे उरकले. त्यानंतर सोहळा दुपारच्या विश्रांतीसाठी धर्मपुरी बंगला येथे विसावला. या ठिकाणी जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांची बैठक झाली. दुपारी सोहळा मार्गस्थ झाला. शिंगणापूर पाटी याठिकाणी पानसकरवाडीला परिसरातील भाविकांच्या दर्शनासाठी सोहळा थांबला. या ठिकाणी जवळच असणाऱ्या शिंगणापूरच्या शंभू महादेवाच्या दर्शनाचाही भाविकांनी लाभ घेतला. त्यासाठी तेथून एस.टी. बसेसची खास सोय करण्यात आली होती. शिवाय खासगी वाहनधारकांनीही वारकऱ्यांना सोय पुरविली.
सायंकाळी ७ वाजता सोहळा नातेपुते येथे मुक्कामासाठी आला. जि. प. सदस्य बाबाराजे देशमुख, सरपंच अमरसिंह देशमुख आदी पदाधिकाऱ्यांबरोबरच ग्रामस्थांनी मोठय़ा उत्साहाने फटाके वाजवून माउलीचे स्वागत केले.
माउलींचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्य़ात
संत ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळ्याने शनिवारी सातारा जिल्ह्य़ाचा निरोप घेत सोलापूर जिल्ह्य़ात प्रवेश केला. पालकमंत्री दिलीप सोपल यांनी माउलींचे स्वागत करून रथाचे सारध्य केले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने तोफांची सलामी देऊन स्वागत करण्यात आले.
आणखी वाचा
First published on: 14-07-2013 at 04:23 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sant dnyaneshwar palkhi takes rest at solapur