हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी काही दिवसांपूर्वी एका उपहारगृह व्यवस्थापकाला शिवीगाळ करत मारहाण केली होती. याचे राज्यभर पडसाद उमटले होते. ही घटना ताजी असताना आता संतोष बांगर यांनी हिंगोली येथील कृषी विभागात राडा घातला असून कार्यालयाची तोडफोड केली आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी कृषी विभागातील काही अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत शिवराळ भाषेत झापलं आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे.
पिक विम्याच्या मुद्यावरुन आमदार बांगर यांनी कृषी अधीक्षकांना शिवीगाळ केली आहे. पिक विमा कंपनीच्या वतीनं दिशाभूल करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित ठेवलं जातंय. विमा कंपनीवर तुमचा वचक नाही का? यावर तुमचं नियंत्रण नाही का? असे सवाल विचारत संतोष बांगर यांनी कृषी अधीक्षकांना शिवीगाळ केली आहे.
“दोन दिवसांत संबंधित विमा कंपनीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. ही कंपनी शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. याबाबतचे सर्व कागदपत्रे माझ्याकडे आहेत. यामध्ये एका शेतकऱ्याची आई ६०-६२ वर्षाची आहे, तिला साधं मराठीही येत नाही. पण त्यांची इंग्रजीमधून सही करण्यात आली आहे. तुमच्यामळेच या कंपन्या असं काम करतात. मला वाटतंय तुम्हालाच येथून खेचत नेलं पाहिजे. या सर्व गोष्टींवर तुमचं नियंत्रण नाही का? तुम्ही काय करत असता? तुमचे एजंट जर तुमचं ऐकत नसतील तर तुम्ही कशाला अधिकारी झाला आहात?” असे अनेक सवाल बांगर यांनी विचारले आहेत.
हेही वाचा- “माझी बहीण आणि पत्नी गाडीत नसती तर…” वाहनावरील हल्ल्यानंतर संतोष बांगरांची संतप्त प्रतिक्रिया
“पीडित शेतकरी सकाळी दहा वाजल्यापासून येथे कार्यालयात येऊन बसले आहेत. तरीही अधिकाऱ्यांचा थांगपत्ता नाही. तुमच्या बापाची पेंड आहे का? तुम्ही कितीही वाजता येता, तुमची प्रतीक्षा करायला आम्ही तुमच्या बापाचे नोकर आहोत का? कानाखाली आवाज काढल्यानंतरच तुम्हाला समजेल… आजच्या आज हा निर्णय झाला पाहिजे आणि संबंधित कंपनी बॅन झाली पाहिजे, अशा शब्दांत संतोष बांगर यांनी अधिकाऱ्यांना झापलं आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या पदाचा मान न राखता शिवराळ भाषेचा वापर करत धमकीवजा इशारा दिला आहे. यामुळे आता कृषी विभागातील कर्मचारी आक्रमक झाले आहेत.