Santosh Deshmukh Brother : बीडमधल्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. या प्रकरणाचे पडसाद अधिवेशनातही उमटले. या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली आहे. तसंच या प्रकरणात ज्याच्यावर संशय आहे तो वाल्मिक कराडही पोलिसांना शरण आला आहे. वाल्मिक कराडला १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान आज संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांनी सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रियाही दिली आहे. तसंच या प्रकरणी एसआयटीही स्थापन करण्यात आली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटी स्थापन
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा चौकशीसाठी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाचे नेतृत्व आयपीएस बसवराज तेली, पोलीस उपमहानिरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा, सीआयडी पुणे यांच्याकडे असणार आहे. तर तेली यांच्या नेतृत्वाखालील या विशेष तपास पथकात पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर, सहायक पोलीस निरीक्षक विजयसिंग जोनवाल, पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने आणि पोलीस उपनिरीक्षक आनंद शंकर शिंदे यांच्यासह पोलीस सहायक पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम जगताप, पोलिस हवालदार मनोज वाघ, पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे, पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे आणि पोलीस शिपाई संतोष गित्ते यांचा समावेश आहे.
हे पण वाचा- बीड जिल्ह्यात शांतता ठेवायची असल्यास, वाल्मिक कराड याला कठोर शिक्षा झाली पाहिजे : रामदास आठवले
आत्तापर्यंत दीडशेहून अधिक लोकांची चौकशी
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सध्या सीआयडीकडून तपास सुरू असून आतापर्यंत दीडशेहून अधिक जणांची या प्रकरणात चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणात दोन कोटींची खंडणी आणि हत्या या दोन्हींच्या संबंधाच्या अनुषंगाने तपास केला जात आहे. दरम्यान या प्रकरणात सीआयडीने आणखी तीन लोकांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. पण हे तीन जण कोण आहेत? याबद्दलची माहिती अद्याप उघड करण्यात आलेली नाही. या हत्या प्रकरणातील काही आरोपी अद्यापही फरार आहेत, त्यांचा देखील शोध सीआयडीकडून घेतला जात आहे. पीटीआयने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
धनंजय देशमुख यांनी काय म्हटलं आहे?
मी स्वतःहून सीआयडी कार्यालयात आलो होतो. मी दोन दिवसांपूर्वीही आलो होतो. तपास कुठपर्यंत आला आहे याबाबतची माहिती मी सीआयडी अधिकाऱ्यांना भेटून घेतली. मी जे काही सहकार्य करु शकतो ते करण्याची तयारी दर्शवली आहे. तपास चांगल्या पद्धतीने सुरु आहे. मात्र काय तपास सुरु आहे आणि कशा पद्धतीने सुरु आहे ते तपासण्यासाठीच मी आलो होतो. माझं तपास अधिकाऱ्यांशी बोलणं झालं. एसआयटीची स्थापना झाली आहे हे आम्हाला समजलं आहे. त्यातले कुठले अधिकारी आहेत याची माहिती घेऊ असंही धनंजय देशमुख यांनी सांगितलं. सीआयडीमार्फत जो काही तपास सुरु आहे तो योग्य दिशेने सुरु आहे.