Santosh Deshmukh Case : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं सोमवारी अपहरण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. संतोष देशमुख यांचं आधी अपहरण करण्यात आलं. त्यानंतर संतोष देशमुख यांचा अनेकांनी शोध घेतला. मात्र, ते आढळून आले नाहीत. त्यानंतर त्यांचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मस्साजोग गावचे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच तेथील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत आज महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत आरोपांना तातडीने अटक करण्याची मागणी केली. तसेच या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी देखील गावकऱ्यांनी केली. गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. मात्र, त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे त्या ठिकाणी दाखल झाले होते.

हेही वाचा : “आरोपींना मोकाट फिरू देणार असाल तर…”, मनोज जरांगेंची सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया

तसेच बीडचे पोलीस अधीक्षक देखील त्या ठिकाणी दाखल झाले. यानंतर पोलीस अधीक्षकांनी नागरिकांची समजूत घालत शांततेचं आवाहन केलं. दरम्यान, त्यानंतर गावकऱ्यांनी केलेल्या मागण्या पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी मान्य केल्या. त्यानंतर जवळपास ८ ते ९ तास सुरु असलेलं आंदोलन गावकऱ्यांनी मागे घेतलं. दरम्यान, पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षकांनी काय माहिती दिली?

“मस्साजोग गावचे संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात सहभागी असलेल्या बाकीच्या आरोपींवर देखील कारवाई करण्याचं काम सुरु असून त्यांना देखील लवकरच अटक करण्यात येणार आहे. तसेच गावकऱ्यांनी एका पीएसआयवर काही आरोप केले होते. त्यानंतर त्या पीएसआयचं लगेच निलंबन करण्यात आलं आहे. तसेच येथील पोलीस निरीक्षक आहेत, त्यांची देखील चौकशी करून शासनाकडे अहवाल सादर करण्यात येणार आहे”, असं पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

“तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची गावकऱ्यांची मागणी केली होती. ती मागणी देखील मान्य करण्यात आली आहे. तसेच गावकऱ्यांची विशेष सरकारी वकिलांची मागणीही मान्य करण्यात आली आहे. आतापर्यंत या घटनेत दोन आरोपींना अटक करण्यात आलं आहे. तसेच बाकीच्या आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांची दोन पथक रवाना करण्यात आली आहेत”, असं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Santosh deshmukh case in sarpanch santosh deshmukhs case massive police action two accused arrested one police officer suspended gkt