Walmik Karad : गेल्या काही दिवसांपासून बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आलेलं आहे, तर या प्रकरणातील एक आरोपी अद्यापही फरार आहे. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. वाल्मिक कराडवरही महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वये (मकोका) कारवाई करण्यात आलेली आहे. मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर वाल्मिक कराडला एसआयटीने ताब्यात घेतलं. त्यानंतर आज वाल्मिक कराडला एसआयटीने बीडच्या न्यायालयात हजर केलं.

यावेळी न्यायालयात एसआयटी आणि सरकारी वकिलांसह वाल्मिक कराडच्या वकिलांनी न्यायालयासमोर आपआपली बाजू मांडली. यानंतर न्यायालयाने वाल्मिक कराडला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, वाल्मिक कराडला ७ दिवसांनी पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे. तसेच न्यायलयात आज नेमकं काय-काय घडलं? याची माहिती वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी दिली आहे.

माहिती देताना माध्यमांशी बोलताना वकिलांनी सांगितलं की, “सरकारी पक्षातर्फे वाल्मिक कराडला १० दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. तसेच १० वेगवेगळे मुद्दे न्यायालयासमोर मांडण्यात आले होते. मात्र, आम्ही न्यायालयाला सांगितलं की याआधी खंडणीच्या गुन्ह्यात १५ दिवसांची कोठडी देण्यात आली होती. त्या खंडणीच्या गुन्ह्यात कुठेही वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा संबंध दिसून आलेला नसल्याचं आम्ही न्यायालयाला सांगितलं. त्यामुळे आता २२ जानेवारी रोजी पुन्हा न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. तेव्हा न्यायालय काय निर्णय देतं हे महत्वाचं असणार आहे”, अशी माहिती वाल्मिक कराडची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी सांगितली.

दरम्यान, न्यायालयात वाल्मिक कराडच्या विरोधात विविध मुद्दे एसआटीच्यावतीने उपस्थित करण्यात आले. मात्र, एसआटीच्यावतीने उपस्थित करण्यात आलेल्या मुद्यांनंतर वाल्मिक कराडची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने वाल्मिक कराडला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आता पुढील सुनावणी २२ जानेवारी रोजी होणार आहे.

न्यायालयाबाहेर कराडच्या समर्थकांची घोषणाबाजी

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला ७ दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावल्यानंतर न्यायालयाबाहेर वाल्मिक कराडच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे न्यायालयाबाहेर काहीवेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, त्यानंतर पोलिसांनी तात्काळ वाल्मिक कराडच्या समर्थकांना बाजूला केलं. तसेच वाल्मिक कराडच्या काही समर्थकांना ताब्यात घेतलं. त्यानंतर गोंधळाची परिस्थिती नियंत्रणात आली.

Story img Loader