Santosh Deshmukh Daughter : बीडमधल्या मस्साजोग नावाच्या गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. या हत्येची चर्चा महाराष्ट्रभरात होते आहे. मागच्याच महिन्यात पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनातही याचे पडसाद उमटले. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात आली. एक मारेकरी अद्यापही फरार आहे. तसंच धनंजय मुंडे यांचा जवळचा असलेला वाल्मिक कराड हा देखील पोलिसांना शरण आला आहे. दरम्यान धनंजय मुंडेंनी राजीनामा देण्याचीही मागणी होते आहे. तसंच बीड, जालना या ठिकाणी निषेध मोर्चेही निघत आहेत. आज जालना या ठिकाणी निघालेल्या निषेध मोर्चात संतोष देशमुख यांच्या मुलीला अश्रू अनावर झाले.
संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध नोंदवण्यासाठी जालना येथे मराठा क्रांती मोर्चाआणि सकल मराठा समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात बोलत संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखला अश्रू अनावर झाल्याचे दिसून आलं. पप्पा, जिथे आहात तिथे हसत राहा असं वैभवी म्हणाली.
वैभवी देशमुख काय म्हणाली?
वैभवी देशमुख म्हणाली की, “आज आमचा आनंद आमच्यापासून हिरावून घेतला आहे. मात्र इथे जमलेल्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळेच आम्ही उभे राहू शकलो, तुमच्यामुळेच आम्ही न्यायाचा लढा पुढे नेऊ शकत आहोत.आपल्याला न्याय मिळवायचा आहे. त्यासाठी तुम्ही मानवतेच्या नात्याने एकत्र येऊन आमच्या कुटुंबीयांच्या पाठीमागे उभे राहिलात तसेच आमच्या पाठीमागे सदैव उभे राहा.”
हे पण वाचा- Ajit Pawar : सुरेश धस यांनी उल्लेख केलेली मुन्नी कोण? विचारताच अजित पवार संतापून म्हणाले, “असल्या फाल्तू…”
माझ्या वडिलांना इतका छळ करून का मारले?
मराठा समाजाला उद्देशून वैभवी म्हणाली, “तुम्ही सगळ्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आहे. आम्ही ज्या वेळेस रस्त्याने चालतो त्यावेळेस आम्हाला धक्काबुक्की होऊ नये म्हणून तुम्ही लोकांना हात जोडून विनंती केली की आम्हाला चालू द्या. त्यासाठी मी तुमचे आभार मानते. माझ्या वडिलांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. माझा एक आरोपींना प्रश्न आहे की, तुम्ही माझ्या वडिलांना इतका छळ करून का मारलं? त्यांना त्यावेळेस किती वेदना झाल्या असतील? मला याचं उत्तर हवं आहे. असं वैभवी म्हणाली आणि त्यानंतर तिचा कंठ दाटून आला.
पप्पा जिथे असाल तिथे..
वैभवी पुढे म्हणाली, “मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की, मी देशमुख कुटुंबातील मुलगी आहे. माझ्या आई वडिलांची मी लेक आहे. पप्पा तुम्ही आज जिथे कुठे असाल तिथे हसत रहा, आम्हाला माफ करा की आम्ही तुम्हाला वाचवू शकलो नाही”, हे म्हणताना वैभवीचा हुंदका सगळ्यांनाच अस्वस्थ करुन गेला.