Santosh Deshmukh : संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. या घटनेनंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. या घटनेचे पडसाद विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही उमटले. तसेच या प्रकरणावर सर्वच स्तरातून तीव्र पडसाद उमटले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबाबत सभागृहात निवेदन दिलं. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड कोणीही असला तरी त्याला शिक्षा होईल. तसेच मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. दरम्यान या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत.
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ शनिवारी मूक मोर्चा
संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध नोंदवत शनिवारी मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये शरद पवारही सहभागी होणार आहेत. काही दिवसांपूर्वी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही बीडमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली होती. दरम्यान मूक मोर्चात संतोष देशमुख यांनी मुलगीही सहभागी होणार आहे. माझ्या वडिलांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे असं तिने म्हटलं आहे.
माझ्या वडिलांना न्याय मिळावा यासाठी मी कुठल्याही मोर्चात सहभागी व्हायला तयार-वैभवी
माझ्या वडिलांच्या मारेकऱ्यांना अटक करुन त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. चार जणांना अटक झाली आहे. आणखी तिघांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे. शनिवारी होणाऱ्या मोर्चात मी सहभागी होणार, माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी मी कुठल्याही मोर्चात सहभागी व्हायला तयार आहे असं वैभवी देशमुखने म्हटलं आहे. वैभवी ही मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी आहे. संतोष देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली. त्यानंतर आता या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी शनिवारी मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.
२१ डिसेंबरला वैभवीने काय म्हटलं होतं?
“सरकारने आम्हाला संरक्षण दिलं पाहिजे. माझे वडील खूप चांगले होते, देवमाणूस होते. त्यांची अशाप्रकारे हत्या करण्यात आली त्यामुळे महाराष्ट्रात ही दहशत आहे की चांगल्या माणसाबरोबर असं झालं तर मग आपलं काय होईल?” वैभवी पुढे म्हणाली, “मला वडिलांचं जे स्वप्न पूर्ण करायचं आहे त्यासाठी मला सरकारने सर्वतोपरी मदत केली पाहिजे अशी अपेक्षा आहे. आत्ता पोलिसांकडून जो तपास सुरु आहे त्यावर आम्ही समाधानी नाही. या घटनेत एकूण सात आरोपी आहेत असं सांगितलं जातं आहे. त्यातल्या चौघांनाच अटक झाली आहे. बाकी तीन आरोपींना तातडीने अटक झाली पाहिजे. तसंच या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराला अटक झाली पाहिजे. आज माझी ही मागणी आहे की माझ्या वडिलांना जसं ठार मारण्यात आलं तशीच शिक्षा आरोपींना झाली पाहिजे.” असं वैभवी देशमुखने म्हटलं आहे.