Santosh Deshmukh Murder : बीड येथील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. हिवाळी अधिवेशनातही या घटनेचे पडसाद उमटले. संतोष देशमुख यांची पत्नी आणि मुलगी या दोघींनीही आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा द्या असं सांगितलं. सरकारने या प्रकरणी कुणाचीही गय केली जाणार नाही असं म्हटलं आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिव्हिल सर्जनशी बोलल्यानंतर त्यांनी काय सांगितलं तो अनुभव कथन केला.

काय म्हणाले अजित पवार?

“बीड जिल्ह्यामध्ये एका सरपंचाची अत्यंत क्रूर हत्या करण्यात आली. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना ठरली. तिथे मी त्यांच्या मुलीला, पत्नीला आणि कुटुंबियांना भेटण्यासाठी मी गेलो होतो. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत याबाबत भाष्य केलं. काहीही झालं तरी या मागे जो मास्टरमाईंड असेल त्याला सोडलं जाणार नाही. कुणीही मास्टरमाईंड असेल तरीही त्याला आम्ही कुणीही सोडणार नाही. अशा कुठल्याही गोष्टी आपण खपवून घेणार नाही. कुणालाही आपण भयभीतपणे जगतोय असं कोणलाही वाटता कामा नये. मी आज देखील तुम्हाला सांगतो आम्ही तिघांनीही यामध्ये लक्ष घातलेलं आहे.”

आम्ही महाराष्ट्रात अशा कुठल्याही गोष्टी खपवून घेणार नाही-अजित पवार

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाबाबत अत्यंत व्यवस्थित उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिलं. न्यायालयाच्या मार्फतही चौकशी करण्यात येणार आहे तसंच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फतही या हत्या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. काहीही झालं तरीही मास्टरमाईंड तो कुणीही असला तरीही त्याला सोडणार नाही. मला आजही काही मित्रमंडळी भेटली त्यांनाही मी सांगितलं अशा कुठल्याही गोष्टी आपण खपवून घेणार नाही. असं अजित पवार म्हणाले.

हे पण वाचा- Santosh Deshmukh : संतोष देशमुख यांच्या पत्नीची साश्रू नयनांनी मागणी, “मुख्यमंत्र्यांनी..”

सिव्हिल सर्जन मला म्हणाला…

अजित पवार पुढे म्हणाले, आपण प्रत्येकाला मदत करण्यासाठी, प्रत्येकाला सन्मानाने जगता येईल यासाठी काम करतो आहोत. मी आज सिव्हिल सर्जनशी बोललो त्यांनी मला सांगितलं, दादा पोस्टमॉर्टेम करताना आजपर्यंत अशा प्रकारची केस मी आयुष्यात बघितली नाही. एखाद्या प्राण्यालाही काठी मारताना आपण म्हणतो जाऊ दे ना कशाला मारतो? अत्यंत अमानुषपणे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्राला या गोष्टी शोभणाऱ्या नाहीत. आम्ही राज्यकर्ते म्हणून बसलो असताना या घटना आम्हालाही शरमेने मान खाली घालायला लावणाऱ्या आहेत. एका पद्धतीचा मेसेज राज्यात गेला पाहिजे की पुन्हा असं कुणी करायचं धाडस करता येता कामा नये. सगळ्या अमानुष लोकांना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आम्ही सोडणार नाही हे आम्ही ठरवलं आहे. असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. बारामतीत त्यांनी जे भाषण केलं त्या भाषणात अजित पवारांनी हे विधान केलं आहे.

Story img Loader