Sarpanch Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज ५० दिवस पूर्ण झाले आहे. या हत्या प्रकरणातील एक आरोपी वगळता सर्व आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी सध्या सीआयडी, विशेष चौकशी पथक आणि न्यायालयीन अशी तिहेरी चौकशी चालू आहे. या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांना सापडत नसल्याने पोलिसांसह सरकारवरही टीका होता आहे. अशात बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी या प्रकरणातील आरोपींना पैसे पुरवणारे आणि त्यांना मदत करणाऱ्यांनाही संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहआरोपी करावे अशी मागणी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरोपींना पैसे पुरवणाऱ्यांना…

या प्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्यांनाही सहआरोपी करण्यात यावे अशी मागणी करताना खासदार बजरंग सोनावणे म्हणाले, “बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या हत्येला आज ५० दिवस उलटले आहेत. तरीही गुन्हा दाखल झालेला एक आरोपी फरार आहे. यावरून बीड जिल्ह्यातील पोलीस, सीआयडी आणि एसआयटी किती चांगलं काम करत आहे, हे दिसत आहे. सध्या जे आरोपी सापडले आहेत, त्यांना गुन्हा दाखल झाल्यानंतरही कोणी कोणी मदत केली, त्यांना गाडी पुरवली, पळून जायला मदत केली आणि पैसे पुरवले अशा सर्वांना या हत्या प्रकरणात सहआरोपी करण्यात यावे.” दरम्यान एबीपी माझाशी बोलताना खासदार बजरंग सोनावणे यांनी ही मागणी केली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरण

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. यातला एक आरोपी कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे. तो सोडून इतर सगळ्यांना अटक करण्यात आली आहे. तर अवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला अटक झाली आहे. 

बजरंग सोनावणे यांचे गंभीर आरोप

संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी खासदार बजरंग सोनावणे यांनी यापूर्वीही गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले होते, “सरपंच संतोष देशमुख यांना टॉर्चर करुन त्यांची हत्या करण्यात आली आहे, हे मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे. शवविच्छेदन अहवालात त्यांच्या शरिरावर ५६ व्रण आहेत. डोळ्यांवर, पाठीवर, पोटावर हे व्रण आहेत. त्यांच्या बरगड्या मोडल्या होत्या. त्यांचा गुन्हा काय होता? त्यांनी गावातल्या वॉचमनला मदत केली ही त्यांची एवढी मोठी चूक होती का? जर पोलीस अधीक्षकांनी वेळीच गुन्हा नोंद केला असता तर कदाचित पुढील गोष्टी घडल्या नसत्या.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Santosh deshmukh murder case beed mp bajrang sonawane walmik karad massajog sarpanch aam