Suresh Dhas in Beed Morcha: बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी आज बीड जिल्ह्यात सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चामध्ये विविध पक्षाच्या आणि संघटनांच्या लोकांनी भाषण करत असताना राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे आणि संशयित आरोपींवर जोरदार टीका केली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी भाजपाचे आमदार सुरेश धस हे पहिल्या दिवसांपासून आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते. आजही त्यांनी आपल्या भाषणातून धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीची करुण कहानी सांगत असताना करुणा धनंजय मुंडे यांचा उल्लेख केला. कालच त्यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या नावाचा उल्लेख केल्यामुळे वाद उद्भवला होता.
करुणाचे खूप हाल झाले
धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड हेदेखील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी असल्याचे विधान मोर्चामधील अनेक नेत्यांनी केले. सुरेश धस यांनी वाल्मिक कराड यांची जिल्ह्यात दहशत असून खंडणी उकळण्याचे आणि ती त्यांच्या आकापर्यंत पोहोचवण्याचे काम केले जात असल्याचा आरोप केला. यावेळी ते म्हणाले, “ही आमच्या बीड जिल्ह्याची करुण कहाणी आहे. मी करुणा कहाणी नाही म्हणत नाही. तिची तर कहाणी वेगळीच आहे. मी फक्त करुण कहाणी म्हणतोय. करुणा तर माझी माय माऊली पहिली बायको आहे. तिचे खूप हाल चालले आहेत. मला याबाबत अधिकचे काही बोलायचे नाही.”
धनंजय मुंडेंचे मंत्रीपद काढून घ्या
सर्वपक्षीय मोर्चात धनंजय मुंडे यांच्याच पक्षाचे आमदार प्रकाश सोळंकेही सामील झाले होते. संतोष देशमुख प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत आणि आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत मुंडेंचे मंत्रिपद काढून घ्यावे, अशी मागणी प्रकाश सोळंके यांनी केली. गेल्या पाच वर्षांत धनंजय मुंडे हेच पालकमंत्री होते. तेव्हा पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं की धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री पद भाड्याने दिले. ते वाल्मिक कराड यांनाच भाड्याने दिले होते. त्यांनी या माध्यमातून बीड जिल्ह्यात जरब बसविली, असाही आरोप प्रकाश सोळंके यांनी केला.