Santosh Deshmukh Family Meet CM Devendra Fadnavis : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या प्रकरणातील आरोपींना कठोरता कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने एसआयटी देखील स्थापन करण्यात आली आहे. यादरम्यान आज संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांबरोबर नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली याबद्दल संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी माहिती दिली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी कोणीही असला तरी त्याला सोडणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे धनंजय देशमुख यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस यांची मुंबईत भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात जे सांगितलं होतं, तेच आश्वासन आम्हाला दिलं आहे. आरोपी असणाऱ्या कोणालाही सोडणार नाही, जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा दिली जाईल. महाराष्ट्राला यातून एक उदाहरण पाहायला मिळणार आहे, इथे गुन्हेगारांना माफ केलं जात नाही आणि तसं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे”.

आम्ही त्यांच्याबरोबर या सगळ्या प्रकरणाची चर्चा केली, आज कुठलंही निवेदन दिले नाही. आमच्याकडे काही ऑफिशीयल गोष्टी होत्या त्या मुख्यमंत्र्यांना दाखवल्या. आम्हाला न्याय पाहिजे तो कसा मिळणार याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलं, असेही धनंजय देशमुख पुढे बोलताना म्हणाले.

हेही वाचा>> साऊथ सुपरस्टार अजित कुमारचा मोठा अपघात, रेसच्या सरावदरम्यान क्रॅश झाली कार; दुर्घटनेच…

गुन्हेगारांना शिक्षा होणार…

निष्पक्षपातीपणे या गुन्ह्यामध्ये तपास झाला पाहिजे अशी भूमिका आपण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडली आणि मुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य केल्याचेही धनंजय देशमुख म्हणाले. या गुन्ह्यामध्ये कोणीही असले तरी त्याला शिक्षा होणार असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खरा सूत्रधार कोण? हे समोर आले पाहिजे अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकरणाच्या तपासासंबंधी बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की, “आम्ही ज्या एफआयआर आहेत त्याप्रमाणे आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोललो. त्यानंतर घटना घडली त्या कालावधीमधील सर्वांचे सीडीआर काढा आणि त्याप्रमाणे सर्व तपास करा असेही मुख्यमंत्र्यांना सांगितले”.

गेल्या चार-पाच महिन्यातील एफआर आहेत, ते एकमेकांशी कसे जुळतात याबद्दल तसेच आतापर्यंत झालेल्या तपासाचा अहवाल मिळण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, दोन दिवसात जो तपास झाला आहे त्याचा अहवाल आपल्याला मिळेल असेही धनंजय देशमुख यावेळी म्हणाले.

Story img Loader