Santosh Deshmukh : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर महिन्यात हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या हत्येवरुन आरोपांच्या फैरी झडल्या. तसंच या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार असल्याचंही समोर आलं. धनंजय मुंडे यांना याच प्रकरणात राजीनामाही द्यावा लागला कारण वाल्मिक कराड हा त्यांचा अत्यंत निकटवर्तीय आहे. दरम्यान संतोष देशमुख यांच्या घराजवळ एका अज्ञात महिलेचा वावर दिसून आला.

नेमकं काय घडलं?

मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घराजवळ एका महिलेचा वावर दिसून आला. ही महिला रात्रभर ठाण मांडून बसली होती. ही महिला म्हणत होती की, “बाप गमावतो तेव्हा काय दुःख असतं ते मला माहीत आहे. त्यामुळे इथवर पोहचले. स्वामिनी श्रीप्रकाश गिरधे असं नाव असल्याचं या महिलेने सांगितलं. मी प्रामाणिकपणे सांगते की रत्नागिरीतून कोल्हापूरला आले. तिथून रेल्वेने पुण्याला आले. पुण्यातून रेल्वेने दौंडला आले. माझ्याकडे सगळी तिकिटं आहेत, त्यानंतर जामखेड गाडी पकडली. तिथून मस्साजोगला आले असा तीस तास प्रवास करत मी आले.” असं या महिलेने सांगितलं. “इथे आल्यानंतर चार शब्द मी ऐकले. मला धनंजय देशमुख यांना भेटायचं आहे. अंजली दमानिया माझ्या खास फ्रेंड आहेत. दमानिया आल्या होत्या तेव्हा आणि टीव्हीवर मी संतोष देशमुख यांच्या मुलीला पाहिलं. मी तिला एक गोष्ट सांगितलं. मी माझी कौटुंबिक पार्श्वभूमी काही आत्ता सांगणार नाही. एक माणुसकीच्या नात्याने मी आले आहे. संतोष देशमुख यांच्या लहान मुलांवर अन्याय झाला आहे. ३० तास प्रवास झाल्याने मी त्रासले आहे.” असं ही महिला सांगत होती.

धनंजय देशमुख यांनी या महिलेबाबत काय सांगितलं?

“अज्ञात महिला हे सांगत होती की तिच्याकडे कृष्णा आंधळे संदर्भातले पुरावे आहेत. कृष्णा आंधळेने काय केलं ते माहीत आहे. असं ती महिला सांगत होती. त्यानंतर मला कुटुंबाने बोलवून घेतलं. मी आलो पण मला थोडा उशीर झाला. १०.३० वाजल्यावर मी घरी आलो तेव्हा ती महिलाही इथेच बसली होती. महिला पोलीसही आल्या होत्या. सकाळी जे काही आहे ते मी सांगते. सकाळ झाल्यानंतर त्या निघून गेल्या. त्यांनी जास्त काही माहिती दिली नाही. त्या सकाळी निघून गेल्या.” टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत धनंजय देशमुख यांनी हे सांगितलं आहे.

संतोष देशमुख हत्या, वाल्मीक कराडकडून खंडणी प्रकरणामध्ये दोषारोपपत्र दाखल ( संग्रहित छायाचित्र )

संतोष देशमुख यांची हत्या डिसेंबर महिन्यात

संतोष देशमुख यांची हत्या डिसेंबर महिन्यात झाली. त्यानंतर हिवाळी अधिवेशनातही या घटनेचे पडसाद उमटले. तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. दरम्यान अंजली दमानिया, संजय राऊत, आदित्य ठाकरे, विजय वडेट्टीवार या सगळ्यांनी हे प्रकरण लावून धरलं होतं. आता संतोष देशमुख यांच्या घराबाहेर अज्ञात महिलेचा वावर दिसून आला आहे.