Santosh Deshmukh Murder Case Update : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या झाली. हत्येला २५ दिवस होऊनही अद्याप मारेकऱ्यांना अटक झालेली नव्हती. यानंतर आज सकाळी मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेला अटक केल्याची माहिती समोर येत आहे. सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे हत्या झाल्यानंतर फरार झाले होते. त्यांना पकडण्यासाठी सीआयडीने प्रसिद्धीपत्रक जारी करत त्यांना फरार घोषित केले होते. त्यानंतर आज दोघांना अटक झाली आहे. तर तिसरा आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. आतापर्यंत जे आरोपी पकडण्यात आलेत ते पुण्यातून पकडण्यात आले आहेत. यावरून संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी संशय व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धनंजय देशमुख म्हणाले, “मी सकाळीच सांगितलं होतं की योग्य तपास सुरू आहे. लवकरच गुन्हेगार जेरबंद होतील. आम्हाला माहिती समजली की दोन मुख्य आरोपी ताब्यात घेतले आहेत. राहिलेला एक आरोपीही ताब्यात येईल. प्रशासनाला आणि सीआयडीला जे सांगायचं आहे ते मी सांगणार आहे.”

हेही वाचा >> Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक; सूदर्शन घुलेसह, सुधीर सांगळेला घेतलं ताब्यात

“एक आरोपी राहिला आहे तो ताब्यात येईल. त्यानंतर या सर्वांची कसून चौकशी होईल. खंडणी, हत्या करणे ही संघटित गुन्हेगारी आहे. सहा-सात मुख्य आरोपी असले तरीही हे रॅकेट खूप मोठं आहे. या गुन्हेगारांना खूप लोकांची साथ आहे. त्यामुळे त्यांना अभय मिळालं आहे, म्हणूनच त्यांनी हे घोर कृत्य केलं आहे. एक राहिलेला आरोपी ताब्यात घेतल्यानंतर चांगल्याप्रकारे चौकशी होईल”, असा विश्वास धनंजय देशमुख यांनी व्यक्त केला.

आरोपी पुण्यात वीस-पंचवीस दिवस कोणाच्या आश्रयाने राहतात?

“मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं आहे की या आरोपींवर मकोका लावण्यात येणार आहे. हा धर्माचा, प्रजातीचा विषय नसून ही विकृती समाजाची आहे. या विकृतीला नष्ट करून समाजाला धडा शिकवला पाहिजे. कोणालाही माफी मिळत नाही याचं उदाहरण यामुळे निर्माण झालं पाहिजे. आम्ही गावातील प्रत्येक माणसाला ओळखतो. पण विकृतींना शिक्षा झाली पाहिजे”, असं धनंजय देशमुख म्हणाले. ते पुढे म्हणाले, “पुण्यातून सगळे सापडले आहेत म्हणजे त्यांना कोणी आश्रय दिला? हे चौकशीतून समोर येईल. हे सराईत गुन्हेगार आहेत. साधे गुन्हेगार नाहीत. महाराष्ट्रापासून लपून वीस पंचवीस दिवस राहतात. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन शिक्षा झाली पाहिजे, नाहीतर माझ्या कुटुंबाचा आणि गावाचा आधार असलेला, आमच्या सर्वांच्या आदर्श असलेल्या माझ्या भावाला न्याय मिळणार नाही”, असं धनंजय देशमुख म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Santosh deshmukh murder case why all accused found in pune asking brother dhananjay munde sgk