Santosh Deshmukh Murder : बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. या घटनेचे पडसाद हिवाळी अधिवेशनातही उमटले. विरोधकांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी सभागृहात आवाज उठवला. यानंतर शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबाबत सभागृहात निवेदन दिलं. यावेळी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली? याचा घटनाक्रम सांगत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन फडणवीस यांनी दिलं. दरम्यान संतोष देशमुख यांच्या मुलीने माध्यमांना प्रतिक्रिया देत आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवेंद्र फडणवीस सभागृहात काय म्हणाले?

“बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढवी लागणार आहेत. या प्रकरणाची पार्श्वभूमी आपण पाहिली तर एका कंपनीने पवनचक्कीमध्ये गुंतवणूक केली. मात्र, काही लोक यासंदर्भात खंडणी द्या अशा परिस्थितीत वावरताना दिसतात. ६ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० च्या दरम्यान पवन चक्कीच्या कंपनीचं ऑफीस असलेल्या ठिकाणी या घटनेतील आरोपी गेले. त्यानंतर त्यांनी एका सुरक्षारक्षकाला आणि एका कंपनीच्या मॅनेजरला मारहाण केली. त्यानंतर मॅनेजरने तेथील सरपंचाना फोन केला. त्यानंतर सरपंच यांच्याबरोबर काही लोक आले मग त्यांनी त्या आलेल्या लोकांना बाचबाची केली. यानंतर ९ डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख हे त्यांच्या गाडीतून जात असताना काळ्या रंगाच्या दोन गाड्यांनी त्यांचा पाठलाग केला आणि संतोष देशमुख यांची गाडी थांबवून त्यांना मारहाण केली. त्यावेळी सरपंच संतोष देशमुख यांचा भाऊ हा आरोपी विष्णु चाटेच्या संपर्कात होता. तेव्हा आरोपी सांगत होता की १५ मिनिटात सोडतो. मात्र, त्यांनी संतोष देशमुख यांना सोडलं नाही आणि त्यानंतर मारहाणीत देशमुख यांचा मृत्यू झाला”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.

हे पण वाचा- Dhananjay Munde : संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडेंनी मौन सोडलं, वाल्मिक कराडविषयीही मांडली भूमिका!

संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी काय म्हणाली?

“सरकारने आम्हाला संरक्षण दिलं पाहिजे. माझे वडील खूप चांगले होते, देवमाणूस होते. त्यांची अशाप्रकारे हत्या करण्यात आली त्यामुळे महाराष्ट्रात ही दहशत आहे की चांगल्या माणसाबरोबर असं झालं तर मग आपलं काय होईल? त्यामुळे गुन्हेगारांना लवकर अटक झाली पाहिजे. मी डॉक्टर व्हावं किंवा चांगलं काहीतरी मोठ्या पदावर जावं असंच माझ्या वडिलांना वाटत होतं आणि मी त्यांचं स्वप्न नक्की पूर्ण करणार” असं वैभवीने म्हटलं आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी वैभवीने संवाद साधला. त्यावेळी तिने हे वक्तव्य केलं. तिला अश्रू अनावर झाले होते.

“माझ्या वडिलांना जसं ठार केलं तेवढीच कठोर शिक्षा आरोपींना द्या”

वैभवी पुढे म्हणाली, “मला वडिलांचं जे स्वप्न पूर्ण करायचं आहे त्यासाठी मला सरकारने सर्वतोपरी मदत केली पाहिजे अशी अपेक्षा आहे. आत्ता पोलिसांकडून जो तपास सुरु आहे त्यावर आम्ही समाधानी नाही. या घटनेत एकूण सात आरोपी आहेत असं सांगितलं जातं आहे. त्यातल्या चौघांनाच अटक झाली आहे. बाकी तीन आरोपींना तातडीने अटक झाली पाहिजे. तसंच या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराला अटक झाली पाहिजे. आज माझी ही मागणी आहे की माझ्या वडिलांना जसं ठार मारण्यात आलं तशीच शिक्षा आरोपींना झाली पाहिजे.” असं वैभवी देशमुखने म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Santosh deshmukh murder his daughter said with tears the way my father was killed punish the accused scj