Santosh Jagdale’s Daughter Asawari To Get Govt Job : कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या महाराष्ट्रातील सहा जणांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने ५० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. यासह पीडित कुटुंबांमधील सदस्यांच्या शिक्षणाची व नोकरीची जबाबदारी राज्य सरकार घेणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

दरम्यान, या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पुण्यातील संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी जगदाळे हिला शासकीय नोकरी दिली जाणार असल्याचं आश्वासन राज्य सरकारने दिलं आहे. आसावरीने माध्यमांसमोर याबाबतची माहिती दिली.

आसावरी म्हणाली, “राज्य सरकार पीडित कुटुंबांसाठी जे काही करतंय त्याबद्दल मी मुख्यमंत्री व इतर सर्व शासकीय लोकांचे मनापासून आभार मानते. त्या सर्वांनी आम्हाला सांगितलं आहे की ते आमच्याबरोबर आहेत. या कठीण काळात आमच्या कुटुंबांबरोबर आहेत. सरकारमधील प्रत्येकजण आम्हाला मदत करेल. राज्य सरकारकडून सांगण्यात आलं होतं की तुमच्या शासकीय नोकरीसाठी आम्ही प्रयत्न करू. आम्हाला आर्थिक मदत व मला शासकीय नोकरीचं आश्वासन देण्यात आलं आहे. त्याबद्दल मी शासनाचे व मुख्यमंत्र्यांचे आभार मानते.”

माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण होणार : आसावरी जगदाळे

संतोष जगदाळे यांची कन्या म्हणाली, “शासकीय नोकरी करणं हे माझं स्वप्न नव्हतं. मात्र, हे माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. मी मोठ्या शासकीय हुद्द्यावर काम करावं अशी त्यांची इच्छा होती. मी लोकांच्या मदतीस यावं असं त्यांना वाटत होतं. मी त्यांचा मुलगा म्हणूनच पुढच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या असं त्यांना वाटायचं. कारण ते मुलगा व मुलगी असा भेदभाव करत नव्हते. त्यांनी मला मुलासारखंच वाढवलं आहे. तूच माझी मुलगी, तूच माझा मुलगा आहेस असं माझे वडील नेहमी म्हणायचे. त्यांची इच्छा होती की मी सरकारी नोकरी करावी किंवा सरकारशी संबंधित एखाद्या ठिकाणी काम करावं, तिथे माझी मदत व्हावी. आता मला वाटतंय की त्यांची इच्छा कुठेतरी पूर्ण होत आहे.

महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू

पहलगाम हल्ल्यात डोंबिवलीतील तीन रहिवासी ठार झाले आहेत. तसेच एका लहान मुलाच्या बोटाला गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे. संजय लेले (४४), अतुल मोने (५२) आणि हेमंत जोशी हे तिघे या दहशतवादी हल्ल्यात ठार झाले आहेत. तर, संजय लेले यांचा मुलगा हर्षल याच्या हाताला गोळी चाटून गेली आहे. त्यामुळे तो देखील जखमी झाला आहे. तर, पुण्यातील कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे या दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. पनवेलमधील दिपील भोसले (६०) यांचा देखील या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे.