सोलापूर : जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करून निष्पाप पर्यटकांची क्रूरपणे हत्या केल्याच्या निषेधार्थ सोलापुरात आंदोलनाचे सत्र सुरू आहे. चार हुतात्मा पुतळ्यांजवळ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले. पहेलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला पाकिस्तान पुरस्कृत असून, त्याबद्दल संपूर्ण देशात शोक आणि संताप प्रकटला आहे.
मोदी सरकारने दहशतवादाचा कायमचा नायनाट होण्यासाठी पाकिस्तानला धडा शिकविण्याची गरज आहे, अशा शब्दांत संतोष पवार यांनी भावना व्यक्त केल्या. या आंदोलनात प्रमोद भोसले, संगीता जोगदनकर, सुहास कदम, चित्रा कदम, खालील शेख, विशाल बंगाळे, प्रकाश जाधव, दत्तात्रय बडगंची आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष श्याम कदम यांच्या नेतृत्वाखाली चार हुतात्मा पुतळ्यांसमोर मेणबत्ती पेटवून पहेलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात आला. दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व निष्पाप पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संघटनेचे शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, महिला जिल्हाध्यक्षा मीनल दास व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडच्यावतीने विजापूर वेशीत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात आला. या आंदोलनात संघटनेचे शहराध्यक्ष मतीन बागवान, जिल्हाध्यक्ष म. शफी रचभरे, राम गायकवाड, पोपट भोसले, बशीर सय्यद, रिजवान दंडोती यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन दहशतवादी हल्ल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.