औषध दुकाने लवकर बंद, रुग्णालयेही धास्तावलेली
संतोष पोळने केलेल्या हत्याकांडांच्या चौकशीमुळे वाईतील रुग्णसेवेत सध्या घबराट पसरली आहे. या प्रकरणी सध्या वाईतील रुग्णालये आणि औषध दुकानदारांची चौकशी सुरू आहे. या चौकशीच्या भीतीने औषध दुकाने सध्या आठ वाजताच बंद होत आहेत तर रुग्णालयांची व्यवस्थाही ‘व्हेंटीलेटर’वर गेली आहे.
संतोष पोळ आणि ज्योती मांढरे यांना सहा खुनांच्या प्रकरणात पोलिसांनी तब्यात घेतले आहे. पोळ याला शासनाने २००२ साली वैद्यकीय व्यवसाय करण्यास परवानगी दिली होती. मात्र त्याने तालुक्यातील धोम आणि वडवली येथे यापूर्वीच दवाखाने उघडले होते. त्या वेळापासून त्याचा वाईतील औषध विक्रेत्यांपासून ते मोठय़ा रुग्णालयापर्यंत अनेकांशी संबंध आलेला आहे. त्याच्याकडे उपचार घेणारे अनेक रुग्ण बेपत्ता आहेत. तसेच त्याने खून करण्यासाठी काही औषधे तसेच अन्य साहित्याचा वापर केल्याचा पोलिसांना संशय असून त्यादृष्टीने या औषध विक्रेते तसेच रुग्णालयांकडे सध्या चौकशी सुरू आहे. मागील बावीस दिवसांपासून या तपासण्या सुरू आहेत. परंतु या तपासणीमध्ये मूळ चौकशीबरोबरच अन्य गोष्टींचीही विाचारणा होत असल्याने शहरातील सर्वच रुग्णसेवा सध्या धास्तावली आहे. कादगपत्रांची मागणी, मागील तपशील, रुग्णांचे तपशील देताना या सर्वाना नाकी दम येत आहे.