कुस्तीपटू महिलांच्या दिल्लीत सुरू असलेल्या लढ्याला इचलकरंजीतील संविधान परिवाराने पाठिंबा दिला आहे. संविधान परिवाराच्या कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांना निवेदन देत महिला कुस्तीपटूंना समर्थन दिले. यावेळी जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयचे राज्य समन्वयक संजय रेंदाळकर यांनी भूमिका मांडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय रेंदाळकर निवेदन देताना म्हणाले, “खेळाडूंचा हा लढा आत्मसन्मान आणि न्यायासाठी आहे. त्यामुळे तमाम नागरिकांनी, संस्था-संघटनांनी त्याला पाठिंबा द्यावा. तसेच खेळाडूंवरील अन्यायाचा निषेध शक्य त्या प्रकारे आणि शक्य त्या माध्यमातून सर्व देशभर नोंदवला जात आहे. या प्रकरणाची न्याय्य चौकशी होण्याकरिता ब्रिजभूषण शरण सिंग यांना त्वरित अटक करणे आणि सर्व संवैधानिक पदांवरून हटवणे गरजेचे आहे.”

नेमक्या मागण्या काय?

१. भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांना त्वरित अटक करा आणि त्यांचे सर्व राजकीय व सरकारी पदभार काढून घ्या.

२. हरियाणातील भाजपा सरकारचे मंत्री संदीप सिंग यांचे मंत्रीपद रद्द करून त्यांना अटक करा.

३. आंदोलक महिला कुस्तीगीरांना संरक्षण द्या.

४. कायद्याच्या अखत्यारित न्याय्य आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि वेळेच्या मर्यादेत चौकशी करून आरोपपत्र दाखल करा.

५. आंदोलक कुस्तीगीर व पत्रकारांविरुद्ध बळाचा वापर करणारे पोलिस अधिकारी आणि संबंधित पोलिस उपायुक्तावर कारवाई करा.

“अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हा नागरिकांचा अधिकार आहे, या अधिकाराचा आदर करा. म्हणजे आत्ताच्या संदर्भात, दिल्लीतील निषेध सभेच्या जागी वीजपुरवठा सुरू करा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा आणि आंदोलनात सहभागी होणाऱ्या सर्वांना संरक्षण द्या. सर्व आरोपांचा तपास सर्वोच्च अथवा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली करा,” अशाही मागण्या यावेळी करण्यात आल्या.

हेही वाचा : प्रभू रामांशी स्वतःची तुलना करत ब्रिजभूषण सिंहांचे वादग्रस्त वक्तव्य, विनेश फोगाट म्हणाली, “देशाचा पंतप्रधान…”

यावेळी रोहित दळवी, स्नेहल माळी, अशोक वरुटे, अमोल पाटील, नम्रता कांबळे, दिग्विजय चौगुले, दामोदर कोळी, उर्मिला कांबळे, ऋतिक बनसोडे, वैभवी आढाव, साद चांदकोटी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanvidhan parivar support protesting women wrestler in delhi ichalkaranji pbs