परळीमध्ये प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी हिचा नाचगाण्याचा कार्यक्रम नुकताच झाला. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. यावरून, एकीकडे राज्यात एसटी कर्मचारी, शेतकरी आत्महत्या यासारखे प्रश्न प्रलंबित असताना महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना हे शोभत का? हा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला. या कार्यक्रमानंतर धनंजय मुंडेंवर टीका होते आहे. शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे.
विनायक मेटे म्हणाले, “परळीत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सपना चौधरीचा नाचगाण्याचा कार्यक्रम ठेवला. कालच अहमदनगरमध्ये ११ लोकांचा होरपळून मृत्यू झाला आणि तो देखील सरकारी रूग्णालयात झाला. त्याचं एवढं मोठं सावट असताना, शेतकऱ्याला आजही प्रश्न मिळाले नाही, त्यामुळे त्यांची काळी दिवाळी साजरी होत असताना. उपाशी पोटी दिवाळी साजरी होत असताना हे इथे सपना चौधरीला ठुमके लावायला लावत आहेत.”
तसेच, “एसटी कामगार घरदार सोडून आपल्या हक्कासाठी धरणे आंदोलन व आक्रोश करतोय. त्या प्रश्नामध्ये लक्ष घालायचं, तर हे सपना चौधरीला आणून ठुमके लावायला लावत आहेत. सामाजिक न्यायमंत्र्यांनी सामाजिक भान राखणं अत्यंत आवश्यक आहे.” असंही मेटेंनी बोलून दाखवलं.
याचबरोबर,“बीड जिल्ह्यात आज खूप मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्याचा कधीतरी आढावा जर पालकमंत्र्यांनी घेतला. जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था, महिलांवरील अत्याचार, अवैध धंदे, जमिनी हडप करण्याचे प्रकार जर थोडं जरी लक्ष घातलं. तर मला वाटतं ते सामाजिक न्याय या खात्याला न्याय देण्यासारखं काम त्यांच्याकडून होईल. धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते असताना जेवढं सामाजिक भान ठेवून ते काम करत होते, ते त्यांचं सामाजिक भान कुठं हरपलंय? असा आमच्या सारख्यांना नक्कीच प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.” असंही विनायक मेटे यांनी यावेळी म्हटलं