नीलेश पवार, लोकसत्ता
नंदुरबार : जिल्ह्यातील सारंगखेडय़ाच्या घोडे बाजारात रावण नामक घोडा चर्चेत आला असून तो पाच कोटींना मागितल्याचा दावा त्याचे मालक करत आहेत. अडीच कोटींचा परमवीर, दोन कोटींचा वारीस, दीड कोटींचा अॅलेक्स आणि बुलंद असे किमती घोडेदेखील शौकिनांना भुरळ घालत आहेत. या सर्व घोडय़ांना कोटय़वधीची किंमत येत असतानाही अश्व संवर्धन केंद्रात मुख्यत्वे प्रजननासाठी त्यांचा वापर होत असल्याने त्यांची विक्री करण्यास मालकांची तयारी नाही. घोडे व्यापारासाठी प्रसिद्ध् असलेल्या सारंगखेडय़ातील बाजारास प्रशासनाने यंदा सशर्त परवानगी दिली. त्यामुळे ज्या बाजारात दरवर्षी तीन हजारांहून अधिक घोडे खरेदी-विक्रीसाठी दाखल होत होते, त्याच ठिकाणी यंदा केवळ दीड हजारच्या आसपास घोडे दाखल झाले. नेहमीच्या तुलनेत कमी घोडे असल्याने त्यांच्या किमती चांगल्याच वधारल्याचे चित्र आहे.
या बाजारात ५० हजारांपासून ते थेट पाच कोटींपर्यंतचे घोडे आहेत. सारंगखेडा घोडे बाजारात सहा दिवसांत ४०० घोडय़ांच्या विक्रीतून दीड कोटीपेक्षा अधिकची उलाढाल झाली आहे. ही तेजी करोनाकाळातील घोडे बाजारातील मरगळ दूर करण्यास महत्त्वाची ठरेल, असे जाणकारांना वाटते. घोडे बाजारात दाखल झालेले एकाहून एक किमती घोडे खऱ्या अर्थाने चर्चेचा विषय ठरत आहेत. नाशिकच्या दरबार स्टड फार्मचे मालक असद सय्यद यांच्या रावण नामक मारवाड जातीच्या घोडय़ाला एका प्रतिष्ठित ग्रुपने पाच कोटींना मागितल्याचा दावा त्याचे मालक करत आहे. काळय़ा रंगाचा आकर्षक असा रावण महाराष्ट्रातील त्याच्या वैशिष्टय़ांमधील एकमेव घोडा असल्याचा दावा करत तो विकायचाच नसल्याचे त्याचे मालक सांगतात. केवळ अश्व प्रदर्शनासाठी आपण हा घोडा बाजारात आणल्याचे त्यांचे म्हणणे आहे. रावणप्रमाणेच बुलंद घोडय़ालादेखील दीड कोटींना मागणी आल्याचे मालक सांगतात. जसकन स्टड फार्ममधील परमवीर नामक घोडादेखील सर्वाचे लक्ष वेधत आहे. पंजाबमधील एका प्रांतात नुकताच पहिला किताब जिंकणारा हा घोडा देखणा आहे. त्याला अडीच कोटींची मागणी आली. तर याच मालकाचा वारीस नामक घोडय़ालाही दोन कोटींची मागणी आहे. जालनाच्या झारा स्टड फार्मच्या अॅलेक्सला दीड कोटींना मागितले गेल्याचा दावा त्याच्या मालकांनी केला आहे.
इतकी प्रचंड रक्कम देऊ करत हे घोडे मागितले जातात. त्यांच्यात काय विशेष आहे, आणि इतकी रक्कम मिळत असताना ते का विकत नाही, याबाबत अनेकांना प्रश्न निर्माण होत आहे. त्याची कारणमीमांसा मारवाड घोडे व्यापार आणि संवर्धन संघटनेच्या सहसचिव गजेंद्रसिंग पाल कोसाना यांनी केली. संबंधित घोडय़ांमधील वैशिष्टय़पूर्ण बाबींमुळे त्यांच्या किमती वधारल्या. पण ते विकायचे नसल्याने अधिक बोली लावून ते खरेदीचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले. मुळात यातील बहुतांश घोडे हे प्रजननासाठी वापरले जातात. त्यापासून निर्मित होणाऱ्या घोडय़ांच्या किमतीदेखील वधारलेल्या मिळत असल्यानेच हे घोडे विक्रीपेक्षा ते अश्व संवर्धन केंद्रात प्रजननासाठी अधिक्याने वापरले जात असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
या घोडय़ांचे आकर्षण कायम ठेवण्यासाठी त्यांची चांगलीच बडदास्त ठेवली जाते. त्यावर प्रचंड खर्च होतो. त्यांच्यासाठी कायमच प्रशिक्षित कर्मचारी, त्यांचा आहार, आरोग्य तपासणी यावर विशेष लक्ष द्यावे लागते. त्याचा विचार करता या घोडय़ांना लागलेली कोटय़वधींची बोली नगण्य ठरते.