शिवसेनेचा इतिहास सांगत-सांगत ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिलेल्या कानपिचक्यांमुळे शिवसेनेचा ३१ व्या वर्धापनदिनाचा मेळावा चांगलाच रंगतदार ठरला. अगदी पहिल्या वाक्यापासून त्यांनी शिवसेनेतील गटबाजीवर टीका केली. सगळ्यांची एकी असती तर महापालिका निवडणुकीत काही जागा अधिक आल्या असत्या, असेही ते म्हणाले. आपसातील भांडण बंद करा, असे सुनावत त्यांनी आपल्या खुमासदार शैलीत केलेल्या टोलेबाजीला शिवसनिकांनीही टाळ्या वाजवून दाद दिली.
‘वर्धापनाच्या कार्यक्रमाला गर्दी कमी का, असे विचारले आणि शिवसनिकांनी सांगितले की, येथील नेते भांडतात हो,’ अशी भाषणाची सुरुवात करीत जोशी यांनी खुमासदार शैलीत कानपिचक्या देण्यास सुरुवात केली. सेनेतील अलीकडच्या गटबाजीवर बोलताना, कोणते दोन गट आहेत असे एकाला विचारले, तर दुसऱ्या गटाचे कोणी नावच सांगायला तयार नव्हते. खरे राजकारण शिकायचे असेल तर औरंगाबादला शिकायला मिळते, असे ते म्हणाले.
त्यांचे हे वाक्य संपताच व्यासपीठावरील नेते हशात रमले होते. जनतेच्या कल्याणासाठी ठाकरे घराण्याच्या चार पिढय़ा पाहिल्याचे सांगत मनोहर जोशी म्हणाले, मी प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे नेते पाहिले. त्यांनी आपल्याला बरेच काही दिले. आता त्यांनी दिलेले टिकवण्यासाठी आपसातील भांडणे बंद करायला हवीत, असे सांगताच शिवसनिकांनीही टाळ्या वाजविल्या. भाषणापूर्वी खासदार खैरे यांनी लांबवलेल्या भाषणावरही त्यांनी टिप्पणी केली. बाहेरून आलेल्या वक्त्यांना अधिक वेळ द्यायला हवा, असेही ते म्हणाले.
खासदार खैरे यांनी भाषणात मित्रपक्ष आपल्यापेक्षा पुढे जात असल्याचे आवर्जून सांगितले होते. कार्यक्रमानंतर त्यावर जोशी यांना विचारले असता तेव्हाही त्यांनी खैरे यांची ती भूमिका चुकीची असल्याचे सांगितले. अशा प्रकारचे वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना काम करणे टाळायचे असते. अधिक काम केले तर त्यांच्यापेक्षा पुढे जाता येते. तसे काम उभे करणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांनी पुन्हा त्यांना कानपिचक्या दिल्या.
शिवसेनेने एकदा मुस्लीम लिगशी हातमिळविणी केल्याचा इतिहास सांगत मनोहर जोशी यांनी शरद पवार, जॉर्ज फर्नाडिस व बाळासाहेब ठाकरे एकदा एकत्र आल्याची आठवण सांगितली. हे तिघे राजकारणात एकत्र आले असते तर शिवसेनेने देशावर सत्ता गाजविली असती, असेही ते म्हणाले. शिवसेनेची जडण-घडण कशी झाली हे सांगत मनोहर जोशी यांनी स्थानिक नेत्यांना दिलेल्या कानपिचक्या शिवसनिकातही चच्रेचा विषय होता. आमदार संजय शिरसाट, संदीपान भुमरे, माजी आमदार आर. एम. वाणी, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, महापौर त्र्यंबक तुपे यांची भाषणे झाली. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी सूत्रसंचालन केले.

Story img Loader