क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ३ ते ५ जानेवारी या काळात सासवड येथे ८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रंगणार आहे. पाच परिसंवाद, लेखक आणि कवी अशा दोन मुलाखती, दोन कविसंमेलने, ‘झेंडमूची फुले’ हा विंडबन कवितांवर आधारित कार्यक्रम, कथाकथन हे या संमेलनाचे वैशिष्टय़ आहे. सासवडच्या रूपाने साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांची जन्मभूमी व संत सोपानदेव यांची समाधीच्या गावात हे संमेलन होत आहे.
‘प्रश्न आजचे, उत्तरे संतांची’, ‘मराठीच्या अस्तित्वाचे प्रश्न आणि मराठी बोली’, ‘माध्यमांतर’, ‘छंदोबद्ध मराठी कविता हरवत चालली आहे का’, ‘राजकीय घडामोडी आणि मराठी साहित्य’ हे संमेलनातील परिसंवादांचे विषय ठरविण्यात आले आहेत.
याखेरीज बाल आनंद मेळा, अभिजात कथांचे वाचन, ज्येष्ठ साहित्यिकांच्या साहित्यावर आधारित दृक-श्राव्य कार्यक्रम, दोन सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. साहित्य महामंडळाच्या मार्गदर्शन समितीने सुचविलेल्या कार्यक्रमांसंदर्भात साहित्य महामंडळाच्या बैठकीमध्ये संमेलनातील कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित करण्यात आली. सासवड येथील संमेलनाचे निमंत्रक आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सासवड शाखेचे अध्यक्ष रावसाहेब पवार या वेळी उपस्थित होते.
संमेलनासाठी दीड हजार रुपये प्रतिनिधी शुल्क निश्चित करण्यात आले आहे. ग्रंथप्रदर्शनामध्ये दोनशे गाळ्यांचा समावेश असून पाच दिवसांसाठी साडेचार हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. एका प्रकाशकाला चार गाळे देण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे. नेहरू स्टेडियमपासून संमेलनस्थळी जाण्यासाठी विशेष बसेसची सुविधा देण्यात येणार असल्याचेही वैद्य यांनी सांगितले. सासवड येथील पालखी तळाचे मैदान, दौलत चित्र मंदिर, आचार्य अत्रे सभागृह आणि नगरपालिकेचे सभागृह अशा चार ठिकाणी संमेलनाचे कार्यक्रम होणार असल्याची माहिती रावसाहेब पवार यांनी दिली.
ग्रंथिदडीऐवजी ग्रंथघोष
दरवर्षीच्या संमेलनातील ग्रंथिदडी या परंपरेऐवजी यंदाच्या संमेलनापासून ग्रंथघोष हा नवा पायंडा सुरू करण्यात येणार आहे. सासवड परिसरातील शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी यांच्यासह साहित्यप्रेमी नागरिक पालखी तळावरील मुख्य मंडपामध्ये पालखीमध्ये ठेवण्यात आलेल्या ग्रंथांचे पूजन झाल्यावर संतवचने, देशभक्तीवर गीते यांचा समूह स्वरांत घोष करणार आहेत, अशी माहिती डॉ. माधवी वैद्य यांनी दिली.
अध्यक्षपदासाठी चौघांचे अर्ज
नागपूर- संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी आतापर्यंत चारजणांनी अर्ज दाखल केले असून ज्येष्ठ कवी प्रा. फ.मु. शिंदे यांना ज्येष्ठ कवयित्री प्रभा गणोरकर यांनी प्रबळ आव्हान दिलेले आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत लेखक अरुण गोडबोले आणि संजय सोनावणी हेही सामील झालेलेआहेत. प्रभा गणोरकर यांनी नागपुरातून विदर्भ साहित्य संघ, मुंबई मराठी साहित्य मंडळ आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेमार्फत अर्ज भरले आहेत. ज्येष्ठ समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे सूचक, कथालेखिका आशा बगे, समीक्षक डॉ. आशा सावदेकर, कवी वसंत वाहोकार आणि कवी लोकनाथ यशवंत अनुमोदक आहेत. बुधवारी त्यांनी मुंबई मराठी साहित्य मंडळामार्फत अध्यक्षपदाचा अर्ज भरला. शिरीष पै सूचक, तर कवयित्री निरजा, माधव भागवत, वसंत गुर्जर आणि मोनिका गजेंद्रगडकर यांनी अनुमोदन दिले आहे. पुण्यातून भरलेल्या अर्जावर रेखा इनामदार यांची सूचक म्हणून स्वाक्षरी आहे. अभिनव मासिकाचे संपादक मनोहर सोनावणे, हेमंत जोगळेकर, विद्या गौरी-टिळक, संदेश भंडारे आणि सुजाता शेणई यांनी त्यांना अनुमोदन दिले आहे. साताऱ्याचे अरुण गोडबोले यांचे नाव सुचवणारा अर्ज महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे दाखल झालेला आहे. डॉ. राजेंद्र माने त्यांचे सूचक आहेत. अरुण गोडबोले चार्टर्ड अकाउंटन्ट असून त्यांनी काही चित्रपट निर्मिती केली आहे. पुण्यातील लोकप्रिय लेखक म्हणून संजय सोनावणी परिचित आहेत. धार्मिक, अध्यात्मिक अंगांनी त्यांनी लिखाण केले आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विठ्ठल वाघ आणि भारत सासणे यांच्या नावांचीही चर्चा होती. मात्र, प्रा. फ.मु. शिंदेंच्या नावामुळे त्यांनी माघार घेतल्याचे कळते. नाव मागे घेण्याची अंतिम तारीख २४ ऑगस्ट असून त्यानंतरच खऱ्या अर्थाने चित्र स्पष्ट होईल. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष माधवी वैद्य यांनी फ.मु. शिंदे, प्रभा गणोरकर, अरुण गोडबोले आणि संजय सोनावणी यांचे अर्ज आल्याचे मान्य केले असून सायंकाळपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल, असे त्या म्हणाल्या.