साताऱ्यातील पाटण, जावळी, वाई तालुक्यांमध्ये दरड कोसळून एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. जावळी व वाई या तालुक्यांमध्ये प्रत्येकी दोन असे एकूण चार जण पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साताऱ्यात पाटण तालुक्यातील ढोकावळे येथे डोंगर कोसळल्यामुळे चार लोक मृत्युमुखी पडले आहेत. तर, इतर लोकांना गावातील मंदिरात आश्रय देण्यात आला आहे. याचबरोबर रस्त्यावर पाणी असल्यामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण होत असून अडकलेल्या सर्व लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची मागणी होत आहे.

सातारा जिल्ह्यात सध्या चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेरघर, हुंबरळी, ढोकावळे या ठिकाणी भूस्खलन झाले आहे. सध्यस्थितीत मिरगाव येथील एक व्यक्ती, रेगंडी (ता. जावली) येथील दोन, कोंढावळे (ता. वाई) येथील दोन, जोर येथील दोन धावरी येथील एक अशा आठ जणांचा बळी गेला आहे. जोर (ता.वाई )येथील दोन व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. जावली तालुक्यातील रेंगडी गावात दोन व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. आणखी दोन व्यक्ती बेपत्ता आहेत. कोंढावळे (ता. वाई) येथील पाच घरे मातीच्या ढिगा-यात दबलेली गेली. त्यातील २७ नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.

पाण्याचा प्रवाहामुळे येथील बहुतांश गावांचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे घरांचे व शेतीपिकाचे आणि सावर्जनिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे. सातारा जिल्ह्यात एक अतिरिक्त एनडीआरएफचे पथक आज (शुक्रवार) सायंकाळपर्यंत दाखल होईल असेही नमूद करण्यात आले आहे.

पाटण तालुक्यातील मिरगाव येथे झालेल्या भूस्खलनामुळे जखमी झालेल्यांना व हुंबरळी येथील जखमींना देखील हेळवाक ता.पाटण येथील आरोग्य केंद्रामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तसेच हुंबरळी येथील घटनेत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली व तेथील जखमी रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सदर भेटीवेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रमोद खराडे, पाटण, हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. वाळवेकर उपस्थित होते. मुसळधार पावसात रस्ते वाहून गेल्यामुळे दुर्घटना स्थळी पोहोचण्यात व मदत करण्यात अडचणी येत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satara a total of eight people died in a landslide at patan jawali and wai msr
Show comments