कराड : डॉक्टर असल्याचे भासवून समीर ऊर्फ रिजवान ताजुद्दीन शेख (रा. आचार गल्ली, मुंब्रा) याने लग्नाचे आमिष दाखवत वारंवार अत्याचार केल्याच्या पीडित महिला डॉक्टरच्या फिर्यादीवरून कराड शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिलेची रिजवान शेखशी ओळख झाली. त्या वेळी त्याने आपण विवाहेच्छू असल्याने मुलगी शोधत असून, पेशाने डॉक्टर असल्याचेही पीडित महिलेला सांगितले. जळगाव येथील एका रुग्णालयात ८० हजार रुपये पगारावर वैद्यकीय अधिकारी असल्याचेही त्याने सांगितले. यावर पीडित महिलेने विश्वास ठेवत त्याच्याशी लग्नास होकार दिला. त्यानंतर १५ जुलै २०२४ रोजी रिजवानने कराडमध्ये येत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर वारंवार भेटण्यास बोलावून तिच्यावर अत्याचार केला.
दरम्यान, ४ ऑक्टोबरला पीडित महिला रिजवानसोबतच्या विवाहाची तयारी करत असताना तिला भ्रमणध्वनीवर अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. समोरून बोलणाऱ्या महिलेने ती रिजवान शेखची पत्नी असून, रिजवानचे खरे नाव समीर शेख आहे. तो डॉक्टर नसून, केमिकल इंजिनीअर आहे. पुण्यातील पाषाण येथे कॅन्टीन चालवत असल्याची माहिती दिली. त्यामुळे समीर ऊर्फ रिजवान शेखने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचे, तसेच पहिले लग्न लपवून खोटा बायोडाटा तयार करीत डॉक्टर असल्याचे भासवून फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्यानंतर पीडित महिलेने कराड शहर पोलिसांत धाव घेतली आहे.