दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे २५ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन, न्यायालयाने त्यांची दोन दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
संबंधित तक्रारदारावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये त्याला मदत करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक धोडीराम शिवाजी वाळवेकर (वय ३७, सध्या रा. गुरुदेव रेसिडेन्सी, तामजाईनगर, सातारा, मूळ रा. बाजार भोगाव, ता. पन्हाळा) याने तक्रारदाराकडे २५ लाखांची मागणी केली होती.
या प्रकरणातील तक्रारदार हे शासकीय कर्मचारी असून साताऱ्यातील शासकीय कार्यालयात ते लिपीक पदावर कार्यरत आहेत. या तक्रारदाराविरूध्द पाणी वाटपाबाबत लाखो रूपये घेऊन ती रक्कम शासनाकडे जमा न करता परस्पर लाटल्यावरून २४ फेब्रुवारी २०२० रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
या फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास सातारा माहुली पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर यांच्याकडे आला होता. यासंदर्भात त्यांनी तक्रारदारास सातारा शहर पोलीस चौकीत व माहुली चौकीत बोलावून घेतले होते. दाखल गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी व त्यामध्ये मदत करण्यासाठी वाळवेकर यांनी तक्रारदार याच्याकडे पैशांची मागणी केली. इतक्या मोठ्या रकमेची मागणी पाहून तक्रारदाराने लाचलुचपत विभागात पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्याकडे तक्रार दाखल केली.आठ दिवसांपासून दोन वेळा सापळा लावूनही चाहूल लागल्याने वाळवेकरने ही लाच स्वीकारली नाही. मात्र, पडताळणीमध्ये त्यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते.
तक्रारदारास सोमवारी लाचलुचपत कार्यालयात बोलावले होते, ते कार्यालयात येत असताना सहायक निरीक्षक वाळवेकर यांनी तक्रारदारास ताब्यात घेऊन दि. ९ जुलै पर्यंत पोलीस कोठडी मिळवली. तक्रारदार पोहचू शकत नसल्याने असलेल्या पुराव्याच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून गुन्हा दाखल करून वाळवेकर यांना सातारा शहर पोलीस ठाण्यातून ताब्यात घेतल्याचे लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक अशोक शिर्के यांनी सांगितले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक अविनाश जगताप, हवालदार विनोद राजे, संभाजी काटकर, तुषार भोसले, निलेश येवले यांनी या कारवाईत सहभाग घेतला. सातारा शहर पोलीस ठाण्यासमोरूनच संदीप वाळवेकर यांना ताब्यात घेतल्यामुळे तेथे उपस्थित पोलीस कर्मचारी व काही अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.