रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील महाबळेश्वर मार्गातील आंबेनळी घाटात झालेल्या अपघातातील जखमी व मृत व्यक्तींना काढण्यात महाबळेश्वर ट्रेकर्स व पोलादपूर पोलिसांना सोमवारी दुपारी यश आले. तब्बल २४ तासांनंतर अपघातातील जखमी झालेल्यांची सुटका करण्यात आली. या अपघातात दोन जण ठार तर चार जण जखमी झाले.
महाबळेश्वरकडे जाणारी फोर्ड फियास्टा गाडी आंबेनळी घाटातील एका अवघड वळणावर खोल दरीत कोसळली. सुमारे सहाशे फूट खोल दरीत अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी पोलीस आणि महाबळेश्वर ट्रेकर्सला प्रचंड मेहनत करावी लागली. तब्बल २४ तासानंतर जखमींना या दरीतून काढण्यात आले. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. वेणूगोपाळ स्वामी खन्ना बिरानी, जमुना बिरानी अशी मृतांची नावे आहेत.
हे सर्व जण बगंळूर येथील रहिवाशी आहेत. पर्यटनासाठी ते महाबळेश्वरला जात होते. मात्र, चालकाचा अंदाज चुकल्याने गाडी खोल दरीत कोसळली. या अपघातात अरविंद बिरानी (वय ३८), अनुपमा बिरानी (वय ३३), अर्पिता राघवन (२५), सुनील महेंद्र (२८) हे चौघ जखमी झाले. जखमींवर पोलादपूर ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत . अपघातग्रस्त कार ६०० फूट दरीत कोसळल्यानंतर जखमींनी मोबाईलवरून आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधला. परंतु, मोबाईलचे टॉवर लोकेशन मिळण्यात उशीर झाल्याने मदत वेळेत पोहोचू शकली नाही. तब्बल २४ तास हे सर्वजण घनदाट जंगलात अन्नपाण्यावाचून राहिले.
साधनसामुग्री अपुरी असतानाही महाबळेश्वर ट्रेकर्सच्या साहसी युवकांनी रात्रीच्या अंधारात जखमी आणि मृतांना बाहेर काढण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. रात्री एक वाजल्यापासून सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंत त्यांचे बचाव कार्य सुरु होते.
संग्रहित लेख, दिनांक 28th Dec 2015 रोजी प्रकाशित
आंबेनळी घाटात दरीत कोसळलेल्या कारमधील चौघांची २४ तासांनी सुटका
महाबळेश्वर ट्रेकर्सच्या साहसी युवकांनी रात्रीच्या अंधारात जखमी आणि मृतांना बाहेर काढण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले.
Written by मोरेश्वर येरमविश्वनाथ गरुड
Updated:

First published on: 28-12-2015 at 08:40 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satara car falls into gorge in poladpur 4 people rescued after 28 hours