सातारा : गेल्या दोन वर्षांत सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात ४३ अल्पवयीन मुलींची प्रसूती झाली असून, यातील बहुतांश मुलींचे बालविवाह झाल्याची माहितीही उघड झाली आहे. प्रसूती झालेल्या विवाहित अल्पवयीन मुलींच्या पतींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
प्रसूतीच्या वेळी कागदपत्रे पाहिल्यावर मुली अल्पवयीन असल्याची बाब उघडकीस आल्याचे जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. ही माहिती रुग्णालयाकडून पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार, अशा अल्पवयीन विवाहित मुलींच्या पतींवर गुन्हे दाखल करण्यात आले. जिल्हा शासकीय रुग्णालयात सन २०२३-२४ मध्ये ३२, तर २०२४-२५ मध्ये ११ अल्पवयीन मुलींची प्रसूती झाली. यातील काही मुली बालविवाहामुळे, तर काही प्रेमसंबंधांतून गर्भवती राहिल्याची माहिती देण्यात आली.
जिल्हा रुग्णालयाच्या या माहितीच्या पार्श्वभूमीवर, महिला आणि बालविकास विभागाकडून बालविवाह रोखण्यासाठीची कारवाईही तीव्र करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांत विभागाने २९ बालविवाह रोखले आहेत.
बालविवाह रोखण्यासाठी जोमाने प्रयत्न आवश्यक
बालविवाह रोखण्याचे प्रयत्न सुरू असतानाही अल्पवयीन मुलींची प्रसूती होत असल्याचे उघडकीस येत असल्याने हे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे स्पष्ट आहे. त्याचप्रमाणे, प्रसूती झालेल्या अल्पवयीन मुलींची संख्या प्रत्यक्षात अधिक असल्याची शंकाही या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. काही प्रसूती खासगी रुग्णालयांत केल्या जाऊन त्यांची नोंदच केली जात नाही, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
आधार कार्ड व इतर ओळखपत्रे तपासल्यानंतर प्रसूतीसाठी आलेली मुलगी अल्पवयीन असल्याचे आढळते. अशा वेळी तिच्या नातेवाइकांविरुद्ध आणि पतीविरुद्ध पोलिसांत तक्रार द्यावीच लागते. सातारा जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत ४३ अल्पवयीन मुलींची प्रसूती झाली आहे. त्यांच्या नातेवाइकांवर आणि त्यातील विवाहितांच्या पतींवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. – युवराज करपे, जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा
हेही वाचा – मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला १०० दिवसांचे लक्ष्य
बालविवाह बरेच वेळा गुप्तपणे केले जातात. असे प्रकार उघडकीस आल्यास पती आणि नातेवाइकांसह विधी करणारे इत्यादी सर्वांवर गुन्हे दाखल होतात. बालविवाह टाळण्यासाठी शासनाने शालेय स्तरापासून जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. गेल्या दोन वर्षांत २९ बालविवाह टाळण्यात यश आले आहे. बालविवाहानंतरचे दुष्परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी या कामी सहकार्य करणे अपेक्षित आहे. – विजय तावरे, महिला व बालकल्याण विभाग, सातारा
जिह्यातील लोणंद, जावली, कराड, पाटण या तालुक्यांतील काही भागांत जात पंचायत चालते. स्वत:च्या रुढी, परंपरा पुढे नेण्यासाठी बालविवाह होताना दिसतात. याविरुद्ध कोणी आवाज उठवला, तर त्याला वाळीत टाकले जाते. यासाठी प्रशासनाने जनजागृती करण्यावर भर दिला पाहिजे. – ॲड. मनीषा बर्गे