सातारा: महाबळेश्वर येथील हैद्राबादच्या निझामांच्या भाडेतत्वावरील १५ एकर १५ गुंठे भूखंड आणि त्यावरील वुडलाॅन हा आलिशान बंगला साताऱ्याचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या आदेशाने सील करण्यात आला आहे. तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांच्या नेतृत्वात मोठ्या पोलीस बंदोबस्ताच्या मदतीने ही धाडसी कारवाई करत मुख्य बंगला आणि आजूबाजूच्या इमारती ताब्यात घेण्यात आल्या आहेत. बाजार भावाप्रमाणे या मिळकतीची किंमत सुमारे २५० कोटी रुपये आहे.
यापूर्वी १ डिसेंबरला ही मिळकत ताब्यात घेण्यासाठी आलेल्या काही लोकांच्या जमावामुळे या भागात तणाव निर्माण झाला होता. याआधीही अनेक वेळा मिळकत ताब्यात घेण्यावरून दोन गटांमध्ये वाद झाले आहेत.ही बाब लक्षात घेऊन सातारचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी २ डिसेंबरला तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांना वुडलाॅन ही मिळकत ताब्यात घेण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तहसीलदारांनी २ डिसेंबरला मिळकत ताब्यात घेण्याची तयारी केली. मात्र पुरेसा पोलीस बंदोबस्त उपलब्ध न झाल्याने तहसीलदारांनी ३ डिसेंबरला कारवाईचा निर्णय घेतला. तहसीलदारांच्या मागणीप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनीही अतिरिक्त पोलीस बंदोबस्त पाठवला होता. त्याचप्रमाणे मदतीसाठी वाईचे तहसीलदार रणजितसिंह भोसले यांच्यावरही मदतीची जबाबदारी सोपविली होती.
हेही वाचा: जुळ्यांचा नादच खुळा! दोन बहिणींनी एकाच तरुणासोबत थाटला संसार, नवऱ्याच्या अंगलट येणार?
आज तहसीलदार सुषमा चौधरी,रणजीत भोसले आणि त्यांची पोलीस बंदोबस्त वुडलॉन बंगल्यावर दाखल झात्या. येथील मुख्य बंगल्या शेजारीच्या कर्मचारी वसाहतीमध्ये मध्ये अनेक वर्षे माजी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे आणि त्यांचे पती माजी नगरसेवक कुमार शिंदे राहत आहेत. त्यांना शासकीय कारवाईची माहिती देऊन सर्व साहित्य बाहेर घेऊन बंगला सोडण्यास सांगितले. आदेशाप्रमाणे शिंदेंनीही संध्याकाळी पाच पर्यंत बंगला रिकामा केला. यानंतर तहसीलदारांसमक्ष मुख्य बंगल्याच्या सर्व खोल्यांना, निझामांच्या स्टाफ क्वार्टरला आणि दोन्ही दरवाजाना सील केलं. तसंच कोणत्याही खाजगी व्यक्तीला प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली. ब्रिटीशांनी हा भुखंड भाडेपट्ट्याने पारशी वकील यांना दिला होता. स्वातंत्र्यानंतर १९५२ साली हिज हायनेस नबाब मीरसाब उस्मान अल्लीखान बहादुर नबाब ऑफ हैद्राबाद यांच्या नावे करण्यात आला. नबाब यांच्याकडे आयकराची मोठी थकबाकी होती. ५९ लाख ४७ हजार ७९७ रूपयांच्या आयकर वसुलीसाठी टॅक्स रिकव्हरी ऑफिसर कोल्हापूर यांच्याकडील पत्रांनुसार थकबाकीची नोंद मिळकतीवर करण्यात आली आणि जोपर्यंत ही वसुली होत नाही तो पर्यंत ही मिळकत विक्री करणे, गहाण ठेवणे आणि कोणत्याही प्रकारचा व्यवहार करण्यास मनाई करण्यात आली.
हैद्राबाद येथील नबाबांचे वारस म्हणून नबाब मीर बरकत अल्लीखान बहादुर यांचे नाव लावण्यात आले. २००३ साली पुन्हा ही मिळकत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्व पट्टेदारांची नावं वगळून मिळकत शासनजमा केली. २००५ साली पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश मागे घेवून पूर्वीप्रमाणे परिस्थिती कायम करण्यात आली.२०१६ साली या मिळकतीचे हस्तांतरण झाले आणि मिळकतीवर डायरेक्टर हर्बल हाॅटेल प्रा. लि. तर्फे दिलीप ठक्कर यांचे नाव लावण्यात आले. तेव्हा पासुन ही मिळकत वादात अडकली होती. ठक्कर आणि नबाब यांच्यात मिळकतीवरून वाद सुरू झाला, तसंच वारंवार मिळकत ताब्यात घेण्याचेही प्रयत्न झाले.
हेही वाचा: संजय राऊतांचे मोठे विधान, म्हणाले “…तर सरकारला अमित शाहादेखील वाचवू शकणार नाहीत”
किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याला जिल्हाधिकाऱ्यांनी अफजलखान थडगे परिसरात अतिक्रमणावर धाडसी कारवाई करून भूखंड मोकळा केला होता. त्यानंतर आज पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार महाबळेश्वर तहसीलदार यांनी धाडसी कारवाई करून २५० कोटी रूपये किंमतीचा भूखंड ताब्यात घेतला आहे.