राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्लाप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. यानंतर आता त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मराठा आरक्षणादरम्यान केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी दीड वर्षापूर्वी दाखल झालेल्या प्रकरणात सातारा पोलिसांनी गुरुवारी त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याच्या एका जुन्या प्रकरणात अ‍ॅड गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदावर्ते यांनी ७ ऑक्टोबर २०२० रोजी एका वृत्तवाहिनीशी बोलताना छत्रपती घराण्याबाबत आक्षेपार्ह विधाने केली होती. यानंतर तारळे (ता पाटण) येथील राजेंद्र निकम यांनी त्यांच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार अ‍ॅड. सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दोन वर्षांपूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यात त्यांच्यावर कारवाई झालेली नव्हती.

शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलन प्रकरणात सदावर्तेना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर सातारा पोलिसांनी सदावर्ते यांना ताब्यात घेतले. साधारणत ६० ते ७० पोलिसांच्या मोठय़ा बंदोबस्तात सदावर्तेना साताऱ्यात आणण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. दोन्ही बाजूच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने सदावर्ते यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारी वकिलांचा युक्तीवाद योग्य ठरवत न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

“सरकारी पक्षाने न्यायालयासमोर जोरदार युक्तीवाद केला. जी घटना झाली ती निंदनीय आहे आणि त्याचा तपास होणे गरजेचे आहे. त्यानंतर न्यायालयाने आमची बाजू ऐकून घेतली. त्यानुसार न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते यांना चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे,” अशी माहिती सरकारतर्फे बाजू मांडणाऱ्या वकिलांनी दिली.

न्यायालयात जोरदार खडाजंगी

सरकारी पक्षाने न्यायालयाकडे १४ दिवसांची पोलीस कोठडी मागत विविध मुद्द्यांचा तपास करायचा असल्याचे सांगितले. सरकारी पक्षाचा युक्तिवाद झाल्यानंतर बचाव पक्षाच्या वतीने सर्व मुद्दे खोडून काढण्यात आले आणि पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात आले. युक्तिवाद सुरू असताना दोन्ही पक्षांमध्ये दोनदा खडाजंगी झाली. खासदार उदयनराजे यांचा पराभव का झाला असा मुद्दा बचाव पक्षाने मांडताच सरकार पक्षाने त्यावर तीव्र आक्षेप घेतला. त्यानंतर सदावर्ते यांच्या वकिलांनी हे वक्तव्य मागे घेत सपशेल माफी मागितली. माफीनाम्यानंतर सरकार पक्षाने सुमोटो गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली.

सदावर्तेंचे वकिल महेश वासवानी उपस्थित नसल्याने वकिल सचिन थोरात, सतिष सुर्यवंशी,  प्रदीप डोरे यांनी सदावर्तेंची बाजू मांडली. त्यांच्या नोटीशीचा कालावधी संपला असून सदावर्तेंना ताब्यात घेणे कायद्यात बसत नसल्याचे सांगितले. यावेळी सदावर्तेंनी स्वतः युक्तीवाद केला. सरकारी पक्षाचे वकील अंजुम पठाण यांनी सदावर्तेंचे म्हणणं खोडून काढले. बाकीच्या गुन्हा बद्दल काय झालं ते इथे बोलू नका या गुन्ह्याबाबत बोला असेही अंजुम पठाण म्हणाले.

हे प्रकरण पोलिसांना गांभीर्याने घ्यायचे होते तर मग मागील दोन वर्षांपासून पोलिसांनी काय केले. या पाठीमागे राजकीय हस्तक्षेप आहे, असे यावेळी सदावर्ते म्हणाले. मी स्वतःचे मत मांडले आहे याचा विपर्यास केला गेला असल्याचेही सदावर्ते म्हणाले. त्यानंतर,सहावे प्रथम न्यायदंडाधिकारी एस. ए. शेंडगे यांनी सदावर्ते यांना सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Story img Loader