सातारा : माण तालुक्यात तारळी प्रकल्पाचे कालव्यात आलेले पाणी दारे उघडून पळवण्याचे प्रमाण वाढले आहे. पाण्यासाठी गावागावांत वाढती भांडणे, तेढ लक्षात घेऊन पाणी चोरू नये म्हणून प्रशासनाने जमावबंदीचा आदेश लागू केला असल्याची माहिती प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी दिली.

अनेक गावांमध्ये केवळ चार दिवसांआड टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, तारळी सिंचन योजनेतून कालव्याद्वारे पाणी मिळावे, यासाठी संतप्त जनता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे कालव्यावर पाणीचोरी होऊ नये म्हणून प्रशासनाने चक्क जमावबंदी लागू केली आहे. माणचे प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी काढलेल्या आदेशानुसार, कालव्याजवळ पाच किंवा त्याहून अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

माण तालुक्यातील वळई, जांभुळणी, पुळकोटी, गंगोती, पानवन, देवापूर, पळसावडे आणि शिरताव या गावांमध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. तसेच, गोंदवले खुर्द, मनकर्णवाडी, पळशी या गावांमध्ये होणाऱ्या धार्मिक, विवाह व अंत्यसंस्कार संबंधित कार्यक्रमांना वगळण्यात आले आहे.कालव्यावरील पाणी पळवण्याच्या घटनांमुळे पाणी नियोजित ठिकाणी पोहचत नाही. त्यामुळे नियोजन बिघडत आहे. यामुळे शासकीय मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेता हा आदेश जारी केला आहे.

तारळी प्रकल्पांतर्गत माण तालुक्यात वाढीव कालवा व अंत्यवितरक कालव्यांमध्ये सुरू असलेल्या पाणी आवर्तनादरम्यान काही गावांमध्ये वारंवार दारे उघडून पाणी पळवण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.हा आदेश २४ एप्रिल रोजीच्या मध्यरात्रीपासून आवर्तनाचा कालावधी संपेपर्यंत तो प्रभावी राहणार आहे. आदेशातून शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना वगळण्यात आले आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी दहिवडी वा म्हसवड पोलीस ठाण्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.