कराड : पुणे- बंगळुरू महामार्गाच्या सुसज्जीकरण कामातील पोटठेकेदार डी. पी. जैन कंपनी अनेक कारणांनी वादग्रस्त ठरली असतानाच या कंपनीस ३८ हजार २१९ ब्रास जादाच्या, गौण खनिज उत्खननप्रकरणी कराडच्या तहसीलदार कल्पना ढवळे यांनी ३८ कोटी ६० लाख ११ हजार ९०० रुपये दंड ठोठावला आहे.
शिरगाव येथील एका गटातून डी. पी. जैन कंपनीस ठराविक मर्यादेपर्यंत गौण खनिजाच्या उत्खननास परवानगी देण्यात आली होती. मात्र, प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करुन, डी. पी. जैन कंपनीने जादाच्या ३८ हजार २१९ ब्रास गौण खनिजाचे उत्खनन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने केलेल्या पाहणीत निदर्शनास आले.
हेही वाचा – सातारा महामार्गालगतची वेळे प्रस्तावित औद्योगिक वसाहत रद्द, सरकारची अधिसूचना जारी
हेही वाचा – सकल मराठा समाज – मराठा क्रांती मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावरून आमने-सामने
त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने खनिकर्म उपसंचालक यांच्यामार्फत सर्व्हे करुन त्याची तपासणी केली. त्यानंतर त्याचा पंचनामा करण्यात आला. त्यावरुन संबंधित कंपनीस मुदतीत त्याचा खुलासा मागवण्यात आला होता. मात्र, कंपनीने तो खुलासा वेळत दिला नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसीलदार कल्पना ढवळे यांना दंड करण्याच्या कारवाईची सूचना केली. त्यानुसार शिरगाव येथील ३८ हजार २१९ ब्रास जादाच्या, गौण खनिज उत्खनन प्रकरणी तहसीलदार ढवळे यांनी डी. पी. जैन कंपनीस ३८ कोटी ६० लाख ११ हजार ९०० रुपये दंड ठोठावला आहे.