वाई, सातारा व पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असणारे वीर धरण ९७.४८ टक्के भरले आहे. त्यामुळे या धरणातून गुरुवारी संध्याकाळी पंचवीस हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग नीरा नदी सोडण्यात आला. तत्पूर्वी दुपारी या धरणातून १५,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता.
वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मागील आठवडयापासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे वीर धरण ९७.४८ टक्के भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची मोठया प्रमाणात आवक होत असल्याने वीर धरणातून पंधरा हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सोडण्यात येत आहे, अशी माहिती वीर धरण अभियंता विजय नलवडे यांनी दिली. दरम्यान, नीरा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा धरण प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे.
वीर, भाटघर, नीरा देवघर, गुंजवणी या नीरा खोऱ्यातील या चारही धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाने चांगली हजेरी लावली असून या पावसामुळे ही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे या धरणामध्ये मोठया प्रमाणात पाण्याची आवक होत असून धरणाच्या एका दरवाज्यातून बुधवारी दुपारी ४ वाजल्यापासून १,२५० क्युसेक व पायथ्या विदयुतगृहातून ८०० क्युसेक असा एकूण २,०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीमध्ये करण्यात येत होता, तो आज दुपारी वाढवून पंधरा हजार क्युसेक तर सायंकाळी पंचवीस हजार करण्यात आला.
धरणात संततधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. वीर धरण ९७.४८ टक्के भरले असून पाणलोट क्षेत्रामध्ये (एकूण ३६० मिमी) पाऊस झाला आहे, तर भाटघर धरण ७०.६२ टक्के (५०३ मिमी), नीरा देवघर धरण ५८.६९ टक्के (१०७१ मिमी) गुंजवणी धरण ८७.२० टकके (११६७ मिमी) भरले आहे. धरणामध्ये येणाऱ्या पाण्यामधे वाढ झाल्यास विसर्गामध्ये वाढ केली जाण्याची शक्यता धरण प्रशासनाच्यावतीने व्यक्त करण्यात आली आहे.