कराड : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत ५५ हजार ५५७ ऑनलाईन नोंदणी करून, सातारा जिल्हा प्रशासनने राज्यात अव्वलस्थान पटकावले. तर, ऑनलाईन, ऑफलाईन अशा एकूण नोंदणीत दुसऱ्या स्थानावर राहत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा त्यांच्या महत्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीत सर्वात अग्रेसर असल्याचे दाखवून दिले आहे.
महायुती सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमतेसाठी पात्र महिलेला दरमहा दीड हजार देणारी ही योजना जाहीर करून, कमी कालावधीत प्रचंड नोंदणीचे शिवधनुष्य उचलले आहे. त्यात सातारा जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका, तलाठी, कोतवाल आणि ग्रामसेवक यांच्याकडून नियोजनबद्ध पद्धतीने आणि प्रचंड ताकदीने ‘लाडकी बहीण’च्या नोंदणीचा कार्यक्रम राबवला जात आहे.
हेही वाचा – सातारा : पश्चिम घाट क्षेत्रात तुफान पाऊस; कोयनेची जलआवक पाचपट वाढली
पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या निर्देशानुसार आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, महिला- बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली या नोंदणीचे काम युद्धापातळीवर सुरु आहे. त्यात पात्र महिला कुठे भेटतील, त्यांचे अर्ज कुठे भरणे शक्य होईल, निर्धारित वेळेपूर्वी नोंदणीचे उद्दिष्ट कसे पूर्ण करता येईल यांचे अभ्यासाअंती नियोजन झाल्याने सातारा जिल्हा प्रशासन या कामात सर्वात पुढे राहिले आहे.
हेही वाचा – सातारा: प्रशासनाच्या निषेधार्थ रिपाईचे रस्त्यावरील पाण्यात होड्या सोडून आंदोलन
सध्या खरीप पेरण्यांमुळे सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा संबंधित महिलेला भेटणे शक्य झाले नाहीतर तिला अगदी पावसाचा मारा आणि चिखलातून वाट काढून भेटत प्रशासनाच्या प्रतिनिधींनी नोंदण्या केल्या आहेत. ऑनलाईन पद्धतीने ५५ हजार ५५७ नोंदणी करून, जिल्ह्याने राज्यात प्रथम तर, ऑनलाईन व ऑफलाईन अशा एकूण नोंदणीत दुसरा क्रमांक मिळवल्याने ‘लाडकी बहीण’ योजनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्याची मान उंचावली आहे. नोंदणीची कालमर्यादा ३१ ऑगस्टपर्यंत असून, तत्पूर्वी नोंदणी मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची हातघाई दिसते आहे.