संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने भाजपाचा दारुण पराभव केला आहे. २१ जागांपैकी १७ जागांवर दणदणीत विजय मिळवत जिल्हा मध्यवर्ती बँकेत महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी वर्चस्व मिळवले आहे. भाजपाला अवघ्या चार जागा मिळाल्या आहेत. मात्र या निवडणुकीमध्ये काँग्रेस आमदाराला पराभव स्वीकारावा लागला आहे.

अत्यंत चुरशीने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या या निवडणुकीसाठी २१ नोव्हेंबर रोजी मतदान झालं होतं. या निवडणुकीमध्ये ८५ टक्के मतदान झालं. याच निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने भाजपचा दणदणीत पराभव केला आहे. २१ जागांपैकी १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत १४ जागांवर विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीने आधीच तीन जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. या निवडणुकीमध्ये राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपाला केवळ चार जागा मिळाल्या आहेत.

नक्की वाचा >> राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातारा जिल्हा कार्यालयावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीच केली दगडफेक

लक्षवेधी ठरलेल्या लढतीमध्ये भाजपाचे राहुल महाडिक, संग्रमसिंह देशमुख, सत्यजित देशमुख आणि प्रकाश जमदाडे हे विजयी झाले आहेत. काँग्रेसचे आमदार व सांगली जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्षांना धक्कादायक पराभव झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि ऐनवेळी निवडणुकीत भाजपच्या उमेदवार घेणारे प्रकाश जमदाडे यांनी विक्रम सावंत यांचा पराभव केला आहे. आमदार विक्रम सावंत हे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे मामा आहेत. त्यामुळे काँग्रेसचा या ठिकाणी ‘योग्य कार्यक्रम’ करण्यात आल्याची जोरदार चर्चा स्थानिक स्तरावर सुरू आहे.

महाविकास आघाडीच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गुलाल उधळून, ढोल-ताशांवर नाचून या विजयाचा आनंद साजरा केल्याचं चित्र पहायला मिळालं.

महाविकास आघाडी

राष्ट्रवादी काँग्रेस – ९ जागा
काँग्रेस – ५ जागा
शिवसेना – ३ जागा

विरुद्ध

भाजपा – ४ जागा

Story img Loader