वाई : महाबळेश्वर, पाचगणी, भिलार, तापोळा परिसरात इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये अवैध बांधकामे वाढत महाबळेश्वरची वनसंपदा धोक्यात येत
आहे. धनदांडग्यांकडून महाबळेश्वरचे अस्तित्वच धोक्यात आणण्याचे काम सुरू आहे. अवैध बांधकामांचे पाणी व वीज कनेक्शन व बेकायदेशीर बांधकामे तोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा चौधरी यांना दिले आहेत.
महाबळेश्वर, पाचगणी परिसरातील इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये अवैध बांधकामे सुरू आहेत. याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी हा आदेश जारी केला आहे. महाबळेश्वर, पाचगणी व भिलार परिसरात नियमबाह्य बांधकामे सुरू असून स्थानिक प्रशासनाने कानाडोळा केल्याने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी नागरिक व ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. याबाबत या परिसरात निसर्गावर अतिक्रमण करणारी बेकायदेशीर बांधकामे ताबडतोब तोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा चौधरी यांना दिले आहेत. बेकायदेशीर बांधकामे वाढू देण्यास स्थानिक ठेकेदार एजंट आणि स्थानिक प्रशासनाचा हातभार असल्याचा आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली होती. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे अवैध बांधकामांना दणका बसला आहे. अवैध बांधकामांचे पाणी व वीज कनेक्शन, तसेच सर्वच बेकायदेशीर बांधकामे तात्काळ तोडा, असे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत.
हेही वाचा – सांगली जिल्हा बॅंकेच्या चौकशीसाठी विशेष समिती – सहकार मंत्री
हेही वाचा – “…तर बाळासाहेबांनी अमित शाहांना ‘मिस्टर इंडिया’ म्हटलं असतं”, एकनाथ शिंदे यांचं विधान
इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये अवैध बांधकामे वाढत असल्याने उच्चस्तरीय सनियंत्रण समितीने (एचएमएलसी) यावर आक्षेप घेत जिल्हाधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश यापूर्वीच दिले होते. तसेच शासनालाही या अनधिकृत बांधकामाबाबत अहवाल सादर केला होता. महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा चौधरी यांना यासंदर्भात विचारले असता त्यांनी अवैध बांधकामांबाबत कारवाई करण्याचा आदेश प्राप्त झाला असून, अवैध बांधकामांवर तात्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.