चालू गळीत हंगामासाठी उसाला पहिली उचल प्रतिटन ३ हजार रुपये मिळावी, अशी मागणी करतानाच खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथे शुक्रवारी झालेल्या ऊस परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांचा सातारा जिल्हा ही शेतक-यांची युद्धभूमी राहील, असे घोषित केले. त्यासाठी १५ नोव्हेंबर रोजी शेतक-यांना कराड येथे येण्याचे आवाहन त्यांनी केले. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, गृहमंत्री आर.आर.पाटील या राष्ट्रवादीच्या नेत्यांना सभेत टीकेचे लक्ष्य करण्यात आले.
परिषदेला जमलेल्या लाखो शेतक-यांना खासदार शेट्टी पहिली उचल किती जाहीर करणार याची उत्कंठा लागून राहिली होती. याच मुद्याचे त्यांनी सविस्तर विश्लेषणही केले. ते म्हणाले, या वर्षी उसाला पहिली उचल साखर कारखानदारांनी जाहीर करावी, यासाठी संधी दिली होती. संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करूनही कारखानदार या विषयी बोलण्यास तयार नाहीत.
गतवर्षी २६०० रुपये पहिली उचल दिली. यंदा कृषिमूल्य आयोगाने ऊस उत्पादन खर्चात केलेली ४०० रुपयांची वाढ गृहित धरून आगामी गळीत हंगामासाठी प्रतिटन ३ हजार रुपये पहिली उचल द्यावी, अशी आमची मागणी आहे. ही मान्य होत नाही तोपर्यंत कारखाने सुरू करू दिले जाणार नाहीत, असा इशारा देतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चर्चेचे दरवाजे बंद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ऊस उत्पादक शेतक-यांचा लढय़ाचा कार्यक्रम जाहीर करताना खासदार शेट्टी म्हणाले, गत हंगामात इंदापूर व वसगडे येथे दोन शेतक-यांना आंदोलनावेळी झालेल्या पोलीस गोळीबारात जीव गमवावा लागला होता. १२ नोव्हेंबर रोजी त्यांच्या गावी आदरांजली मेळावा घेतला जाणार आहे. तेथे आपण व प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत लढय़ाची दिशा स्पष्ट करू. १५ नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या कराड नगरीमध्ये शेतक-यांना जमण्याचे आवाहन त्यांनी केले. सहकारी साखर कारखानदारी समृद्ध झाल्याचे स्वप्न यशवंतरावांनी पाहिले होते, पण त्यांच्या वारसदारांनी साखर कारखाने घशात घालून शेतक-यांना देशोधडीला लावले आहे. शेतक-यांना वाचवा, त्यांना मुक्ती-न्याय द्या अशी आर्थ साद या दिवशी चव्हाण साहेबांना घातली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. ऊस गळीत हंगाम सुरू होण्याच्या पाश्र्वभूमीवर साखरेचे दर राज्यकर्त्यांकडून कृत्रिमरीत्या पाडले जातात असे म्हणत शेट्टी यांनी शरद पवार यांना टीकेचे लक्ष्य केले. साखर कारखाना विक्रीमध्ये ७०० कोटीचा घोटाळा झाला असून त्याची चौकशी गृहमंत्र्यांनी आपल्यापासून करावी. कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास आपली तयारी असल्याचे सांगत त्यांनी तासगावचा साखर कारखाना चालविण्यास देण्याचे आवाहन आर.आर.पाटील यांना केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा