कर्जत : कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने कुकडीचे पाणी हे अतिशय अत्यावश्यक असून , उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे. मात्र अद्यापही तालुक्यातील राशीन परिसरातील चिलवडी मेन चारीलाच फक्त आवर्तन सोडण्यात आले आहे. या परिसरातील मोठ्या प्रमाणामध्ये अनेक गावे कुकडीच्या पाण्यापासून वंचित राहिले आहेत. तरी या सर्व गावांना तात्काळ पाणी देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते युवराज हाके यांनी केली आहे. पाणी न मिळाल्यास तीव्र आंदोलन करू असे निवेदन त्यांनी पाटबंधारे विभाग कुकडी कार्यालय कोळवडी, प्रांत अधिकारी, तहसीलदार यांना दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या निवेदनामध्ये श्री हाके यांनी पुढे म्हटले आहे की, कुकडीचे आवर्तन सुटले आहे मात्र अद्यापही राशिन परिसरातील अनेक गावांना पाणी मिळाली नाही. देशमुखवाडी नारजुत तलाव यामध्ये कुकडीचे पाणी सोडण्याची गरज आहे. त्याचा फायदा देशमुख वाडी कानगुडेवाडी व सोनाळवाडी यांना होणार आहे. तसेच राशीन प्रभाग क्रमांक एक व दोन प्रभागातील गवळण, सायकर वस्ती नांदणी नदीत कुकडीचे पाणी सोडले तर येसवडी,आखोनी, वायसेवाडी ,करमणवाडी तसेच जुन्या शिंपोरा गावाचा पिण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील सुटणार आहे याच प्रमाणे बेलोरा व मकाई चारीचे पाणी करपडीच्या तलावामध्ये सोडले तर करपडीच्या व जवळपासच्या चार गावांचा पिण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटणार आहे. मात्र आवर्तन सुटून बरेच दिवस झाले तरी देखील मागणी केल्याप्रमाणे एकाही तलावामध्ये व टेल असणाऱ्या शेतकऱ्यांना अद्याप पाणी मिळालेले नाही. राशीन परिसरातील बहुसंख्य भाग अद्यापही पाण्यावाचून वंचित आहे. जर आत्ता कुकडीचे पाणी मिळाले नाही तर या परिसरातील चिलवडी होलेवाडी रौकाळवाडी परीट वाडी काळेवाडी करपडी मानेवाडी खदान वाडी आखोणी व शिंपोर यासह सर्वच भागांमध्ये उन्हाळ्यामध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतातमधील उभे पिक जळून जाईल जनावरांचा चाऱ्याचा व पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण होणार आहे. यामुळे या परिसरामध्ये तात्काळ सर्व चारी, पोट चारी तलावांमध पाणी सोडावे अशी मागणी युवराज हाके यांनी केले असून, त्यांनी तसे कुकडीचे पाटबंधारे विभाग पत्र प्रांताधिकारी तहसीलदार पोलीस निरीक्षक यांना दिले आहे.